नवी मुंबई : बलात्काराचा दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी १४ लाखाची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तडजोड करून अडीच लाख रुपये स्वीकारले जात असताना एनआरआय पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका मध्यस्थीचा समावेश आहे.
बलात्काराच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या दीपेश त्रिपाठी याच्या पत्नीकडे १४ लाख रुपयांची खंडणी मागितली जात होती. त्रिपाठी विरोधात बलात्काराची तक्रार करणाऱ्या मुलीसह तिच्या आईकडून मध्यस्थी महिलेमार्फत या पैशाची मागणी केली जात होती. १४ लाख रुपये दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा मागे घेतो अशी हमी त्यांना दिली जात होती. मात्र एवढे पैसे नसल्याचे त्रिपाठी यांच्या पत्नीने सांगितल्याने तडजोड करून अडीच लाख रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले होते. मात्र सदरचा गुन्हा खोटा असल्याने तेवढे पैसे देखील देण्याची मानसिकता त्रिपाठी कुटुंबीयांची नव्हती. यामुळे त्यांनी एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांच्याकडे तक्रार केली होती.
त्याद्वारे उपायुक्त विवेक पानसरे, सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र पाटील यांनी निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहायक निरीक्षक समीर चासकर आदींचे पथक केले होते. या पथकाने सोमवारी खंडणीची रक्कम स्वीकारल्या जाणाऱ्या ठिकाणी सापळा रचला होता. शिवाय त्रिपाठी यांच्या पत्नीकडे बनावट नोटा दिल्या होत्या. त्यानुसार मध्यस्थी महिलेने त्रिपाठी यांच्या पत्नीला दोन ठिकाणी फिरवल्यानंतर तक्रारदार तरुणी व तिची आई असलेल्या ठिकाणी आणले. यावेळी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यामध्ये मध्यस्थी करणारी कथित समाजसेविका मनीषा घोडके, प्रकाश डोली, करणसिंग सिंग व बलात्काराच्या गुन्ह्यातील तक्रारदार तरुणी व तिच्या आईचा समावेश आहे. त्यांनी इतर कोणाकडे अशा प्रकारे खंडणी उकळली आहे का याचा तपास एनआरआय पोलीस करत आहेत.