भुवनेश्वर : महिलांशी मैत्री करून ७ राज्यांत ३८ वर्षांत १४ लग्ने करणाऱ्या रमेश चंद्र स्वैन (६६) याला अटक झाली आहे. रमेश चंद्र स्वैन ओडिशाचा डॉन जुआन नावाने कुख्यात असून त्याने शिक्षक, उच्च न्यायालयातील वकील, पोलीस कर्मचाऱ्यासह अनेक नोकरदार, व्यावसायिक महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न केले. प्रसारमाध्यमातील वृत्तांनुसार ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील गावात राहणारा रमेश चंद्र स्वैन याने तो आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात उपमहासंचालक असल्याचे सांगून महिलांना फसवले.
डॉन जुआन याने आपल्याच पत्नींना लाखो रुपयांना फसवले. फसवल्या गेलेल्या महिलांमध्ये ३ दिल्लीत, २ ओडिशात, मध्य प्रदेश, पंजाबमध्ये प्रत्येकी दोन, आसाम, झारखंड आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एकेक राहते. पोलिसांनी डॉन जुआनच्या १४ पैकी ९ पत्नींना शोधून काढले असून इतरांचा शोध सुरू आहे. भुवनेश्वरचे पोलीस उपायुक्त यू. एस. दास म्हणाले की, “स्वैनने फसवलेल्या महिला या सामाजिक बंधनांमुळे समोर येत नाहीत, असा आम्हाला संशय आहे.” डॉन जुआन ऊर्फ रमेश याने पहिले लग्न १९८२ मध्ये तर शेवटचे २०२० मध्ये दिल्लीतील आर्य समाज मंदिरात शिक्षिकेशी केले. तरीही त्याचे म्हणणे असे की, मी या महिलांशी लग्न केलेले नाही. त्याच्या पहिल्या पत्नीपासूनची तिन्ही मुले डॉक्टर असून ते विदेशात राहतात. त्याची दुसरी पत्नी डॉक्टर असून ती प्रयागराजमध्ये राहते. स्वैन याच्याशी मैत्रीची इच्छा असलेल्या महिलांना त्याने फसवले, असे सहायक पोलीस आयुक्त संजीव सतपथी म्हणाले.
विवाहित असल्याची तिला कुणकुणडॉन जुआन हा वैवाहिक संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करायचा. शेवटच्या लग्नात महिलेला रमेश विवाहित असल्याची कुणकुण लागली. तिने ५ जुलै, २०२१ रोजी भुवनेश्वरमध्ये महिला पोलीस ठाण्यात तक्रार दिली व फसवणूक उघडकीस आली.