नोएडा – राष्ट्रीय राजधानी दिल्लीनजीक नोएडा येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका १४ वर्षीय मुलीनं स्वत:च्या आईचीच निर्घृण हत्या केली आहे. संतापाच्या भरात या मुलीनं हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. रागात या अल्पवयीन मुलीने आईवर तव्याने २०-२२ वार केले. त्यामुळे आईचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मुलीच्या कुटुंबालाही धक्का बसला आहे. हत्येचं कारण ऐकून पोलीसही हैराण आहेत.
पोलिसांनी आरोपी मुलीला घेतलं ताब्यात
उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्ध नगर परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या मुलीनं तिच्या आईवर जड वस्तूने प्रहार केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी १४ वर्षीय मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेत वापरण्यात आलेला लोखंडी तवाही पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने तिला ज्युवेनाईल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले.
महिलेच्या शरीरावर २०-२२ वार
या घटनेबाबत नोएडा एडिशनल डिप्टी पोलीस कमिश्नर रणविजय सिंह म्हणाले की, अनुराधा नावाच्या ३४ वर्षीय महिलेला गंभीर अवस्थेत नोएडा येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यासाठी आणलं होतं. याठिकाणी उपचाराआधीच डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तपास सुरु केला. महिलेच्या शरीरावर २०-२२ वार केल्याच्या खूणा आढळून आल्या. तिचा कानही कापण्यात आला होता. या प्रकरणी मृत महिलेच्या भाऊ मुकेश राठोडनं भाचीविरोधात तक्रार दिली. त्यानंतर कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंद करत पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतलं.
मुलीनं का केली आईची हत्या?
पोलीस तपासावेळी आरोपी मुलीनं सांगितले की, आईच्या चारित्र्यावरुन तिचे शाळेतील मित्र नेहमी टोमणे मारायचे. आई माझ्याशीही नेहमी वाद घालायची. त्यामुळे मी नेहमी त्रस्त होते. त्यामुळे मी तिच्यावर हल्ला केला आणि भीतीपोटी फ्लॅटच्या बाहेर निघून गेली. काही वेळाने ती घरी आली आणि शेजाऱ्यांना सांगून कुणीतरी आईवर हल्ला केल्याची बतावणी केली. मी खाली गेली होती. परत आल्यावर पाहिलं तर आई गंभीर अवस्थेत पडली होती. कुणीतरी आईला बेदम मारल्याचं ती म्हणाली. मात्र पोलिसांना मुलीच्या जबाबावर संशय आला त्यामुळे त्यांनी कसून चौकशी केली तेव्हा अल्पवयीन मुलीने हत्येची कबुली दिली.