गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यासह सीमावर्ती भागातील स्थानिक शेतकऱ्यांकडील गुरे खरेदी करून, ती पाच मालवाहू वाहनात कोंबून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. या कारवाईत १४१ गाई, बैल, म्हशींना वाचविण्यात पोलिसांना यश आले, तर जनावरे वाहनात गुदमरून मरण पावली. पाचही वाहने जप्त करून ११ आरोपींना अटक करण्यात आली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री ते पहाटेपर्यंत केली. प्राप्त माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील काही मोठे व्यापारी शेतकऱ्यांकडील गुरे खरेदी करून, ती कत्तलीसाठी हैदराबाद, तेलंगणाकडे घेऊन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. ही जनावरे ५ कंटेनर, ट्रकमधून जाणार असल्याची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पो.निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनात रवाना झाले. जनावरांनी भरलेली ही वाहने कोरची-कुरखेडामार्गे येत असल्याचे समजल्याने, या पथकाने वैरागड ते ठाणेगाव दरम्यान सापळा रचला. दरम्यान, पहाटे २ वाजताच्या सुमारास आयशर ट्रक क्रमांक एमएच २९, बीई १५८२, ट्रक क्र. एमएच ४९, एटी ०५६८, ट्रक क्र. टीएस १२, युसी ९७६८, ट्रक क्र.एमएच २९, एएन ५७८६, ट्रक क्र. एमएच ४०, बीजी ९९९२ असे पाच ट्रक येताच, त्यांना अडविण्यात आले. त्या वाहनावरील चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता, वाहनांत जनावरे असल्याची कबुली त्यांनी दिली.
त्या जनावरांना अत्यंत निर्दयीपणे कोंबलेले होते. त्यामुळे त्यातील ५ जनावरे मृत पावली होती. उर्वरित जनावरांना कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव येथील गोशाळेत पोहोचविण्यात आले. ही कारवाई पो.निरीक्षक उल्हास भुसारी, सहा.पोलीस निरीक्षक विक्रांत सगणे, एएसआय दादाजी करकाडे, तसेच खुशाल गेडाम, किशोर इंगोले, धनंजय पत्रे, भाऊराव बोरकर, नरेश सहारे, सत्यम लोहंबरे, नीलकंठ पेंदाम, शुक्रचारी गवई, सुनील पुट्टावार, माणीक दुधबळे, मंगेश राऊत, माणिक निसार, विनोद बुरांडे, शेषराव नैताम आदींनी केली.
१ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी एकूण ५ ट्रक (किंमत ९७ लाख), आरोपींनी वापरलेले १० मोबाइल (किंमत १ लाख १३ हजार) आणि जनावरांची किंमत (१७ लाख ५५ हजार) असा एकूण १ कोटी १५ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वेगवेगळ्या जिल्ह्यांतील आरोपी
अटक केलेल्या आरोपींमध्ये शाहबाज हमीद खान (२३, रा.हैदराबाद), अब्दुल अजीज अब्दुल रहू (२८, रा.गडचांदूर), करीम खान नबी खान (३७, रा.कलगाव, जि.यवतमाळ), आसिफ मोहसीन कुरेशी (२७, नागपूर), मिर्झा मुजाहिद मुबारक बेग (२४, रा.मंडल जेन्नूर, तेलंगणा), मिर्झा गफ्फार बेग (३४, रा.उतनूर, जि.अदिलाबाद), शेख अस्लम शेख नवाज (१९, रा.किरगिरी, तेलंगणा), लतिफ खान (३२, इलियासनगर, जि.अदिलाबाद), राजू मदन पाल (४५, यशोधरा नगर, नागपूर), राजेश हृदयसिंग मडकाम (२५, नेवासा, मध्यप्रदेश) आणि कमलेश उर्फ पिंटू नत्थुलाल गुप्ता (३८, रा.नागपूर) अशा ११ जणांचा समावेश आहे.