- मधुकर ठाकूर
उरण : मुंबई महसूल गुप्तचर संचालनालय विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत संत्र्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून १९८ किलो हाय प्युरिटी क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन आणि ९ किलो शुद्ध कोकेन जप्त केले. शनिवारी वाशी जवळ कारवाई करण्यात आली. आयात केलेल्या संत्र्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह चालकाला अटक करण्यात आली आहे. या अमली पदार्थांच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १४७६ कोटी रुपये असल्याचा दावा सुत्रांकडून करण्यात येत आहे.
मुंबई महसूल गुप्तचर संचालनालय विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपये किंमतीच्या अमली पदार्थांच्या साठ्याची तस्करी केली जात असल्याची माहिती गुप्त खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. वाशीजवळ संशयित ट्रक येताच त्याला अडवण्यात आले. या संशयित ट्रकची तपासणी केली असता "व्हॅलेन्सिया संत्री घेऊन जाणाऱ्या कार्टनमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आल्याचे निदर्शनास आले.
संत्र्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये लपवून ठेवण्यात आलेला १९८ किलो उच्च शुद्धता क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन (बर्फ) आणि १४७६ कोटी रुपयांचे ९ किलो उच्च शुद्धता कोकेनचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी माल आयात करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे. पुढील तपास सुरू आहे, असे डीआरआयच्या सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.