मुंबई - गुजरातमधील भद्रेश ट्रेडिंग कॉर्पोरेशन कंपनीने 15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका खासगी बॅंकेने आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईवोडब्ल्यू) केली आहे. आरोपीच्या कंपनीने या बॅंकेकडून कर्ज घेतले होते. याबाबत संबंधित खासगी बॅंकेच्या वतीने विजयकुमार चौधरी यांनी ईओडब्ल्यू तक्रार केली आहे.
बॅंकेने 2014 साली कापड व्यवसायातील भद्रेश ट्रेडिंग कॉर्पोरेशनला तीन प्रकारची कर्ज दिली होती. वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील शाखेतून एक तर अहमदाबाद येथील शाखेतून दोन कर्जांची प्रक्रिया करण्यात आली होती. भद्रेश ट्रेडिंग कॉर्पोरेशनने ही कर्ज सात कंपन्यांशी निगडित व्यवहारासाठी घेतली होती. त्यासाठी कंपनीचे मालक भद्रेश मेहता, त्यांची पत्नी हीना आणि मुलगा पार्थ यांनी भूज येथील सात एकर जमीन गहाण ठेवली होती.
या कंपनीने ऑगस्ट 2015 पासून कर्जाचे हप्ते थकवण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत बॅंकेने चौकशी केली असता कर्ज घेताना दाखवण्यात आलेल्या कंपन्यांसोबत कोणतेही खरेदी-विक्रीचे व्यवहार केले नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बॅंकेने जून 2016 मध्ये ते कर्ज "नॉन परफॉर्मिंग ऍसेट' जाहीर करून बीकेसी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार या तिघांवरही फसवणूक आणि बनावट कागदपत्रे बँकेला सादर केल्याने गुन्हे दाखल करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेहता याने यापूर्वी कच्छ येथील 350 एकर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे गहाण ठेवून 750 कोटींचे कर्ज घेतले होते. या प्रकरणात राजस्थान एटीएसने त्याला यापूर्वी अटक केली होती.