सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अजंठा चौकालगत असणाऱ्या एका साडी सेंटर दुकानात बंदुकीचा धाक दाखवून दोघांनी दीड लाखाची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील अजंठा चौकामध्ये साडी सेंटर या नावाचे दुकान आहे. शनिवारी रात्री दुकान मालक नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गल्ल्यातील रक्कम मोजत होते. त्याचवेळी दोन तरुण त्यांच्या दुकानात आले. बंदुकीचा धाक दाखवून दुकानदाराकडून दिवसभरात विक्रीतून आलेली दीड लाखाची रक्कम घेऊन लुटारूंनी पलायन केले.
या प्रकारानंतर संबंधित दुकानदाराने सातारा शहर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संबंधित चोरटे ओळखीचे आहेत का, याची चाचपणी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, ही पथके सातारा शहरासह, कराड, कोरेगाव येथे रवाना सुद्धा झाली आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी दुकानाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी संबंधित लुटारू साडी सेंटर दुकानासमोर घुटमळत असल्याचे दिसून आले. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.