पिंपरी : विमा पॉलिसी नसतानाही विमा असल्याचे भासवून त्याचे पैसे मिळविण्यासाठी टॅक्स आणि प्रोसेसिंंग फी भरण्यास सांगत १५ लाख ७५ हजार ८१० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल फोनधारकांवर गुन्हा दाखल आहे. इंद्रजित विजयसिंह भोसले (वय ४४, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी इंद्रजित भोसले यांची कुठलीही विमा पॉलिसी नाही. असे असतानाही काही मोबाईल फोनवरून त्यांच्याशी काही व्यक्तींनी संपर्क साधून त्यांची विमा पॉलिसी असल्याचे भासवून खोटी कागदपत्रे पाठविली. वेळोवेळी फोन करून विम्याची रक्कम वाढत असल्याचे सांगितले. विम्याचा कालावधी संपल्याने त्या पैशांसदर्भात आरोपी मोबाईलधारकांनी पैसे काढण्याचे भोसले यांना सांगितले. मात्र विम्याच्या रकमेवरील टॅक्स आणि प्रोसेसिंंग फीच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यात १५ लाख ७५ हजार ८१० रुपये भरण्यास भाग पाडले. २७ मार्च ते १० ऑक्टोबर २०१८ या कालावधीत त्यांनी ही रक्कम भरली. त्यानंतरही त्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. कोणतीही विमा पॉलिसी नसल्याचे आणि अशा प्रकारचे विमा पॉलिसीचे कार्यालय कोठेही अस्तित्वात नसल्याचे लक्षात आल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादी भोसले यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
पिंपरीत विमा असल्याचे भासवून १५ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 6:19 PM