- जमीर काझी
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस व राज्य सरकारच्या बदनामीसाठी सोशल मीडियावर तब्बल दीड लाख बनावट अकाउंट उघडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायबर व फॉरेन्सिक विभागाने त्याबाबतचा अहवाल मुंबई पोलिसांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.देश-विदेशातून तयार केलेल्या बनावट खात्यांपैकी बहुतांश बंद करण्यात आली आहेत. बदनामीची माेहीम कोणी सुरू केली, यामागे कोण होते, याचा तपास करण्याच्या सूचना मुंबई पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. सुशांतने १४ जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र त्यानंतर काही दिवसांतच मुंबई पोलीस तपासात दिरंगाई करीत आहेत, शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणात सहभाग आहे, त्यांना वाचविले जात आहे, अशा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या जात होत्या.सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर तपास सीबीआयकडे सोपविला गेला, त्यानंतर मुंबई पोलिसांवर सोशल मीडियावरून टीका होऊ लागली. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकवर सुशांतच्या कुटुंबाला पाठिंबा देणारे पोस्ट, हॅशटॅग सुरू झाले. मात्र सीबीआय तपासातून अद्याप काहीही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.एम्सने सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल दिल्याने मुंबई पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे राज्य सरकारने या कालावधीत सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सायबरने फेक अकाउंटबद्दल माहिती घेतली आहे. त्यामध्ये ५ महिन्यांत तब्बल दीड लाख बनावट अकाउंट असल्याचे उघडकीस आले. त्यातील अनेक अकाउंट चीन, नेपाळ, दुबईतून तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले.