अकोला : केंद्र शासनाने चलनातून बाद केलेल्या एक हजार व ५०० रुपयांच्या १५ लाख रुपयांच्या नोटा स्थानिक गुन्हे शाखेने न्यू राधाकिसन प्लॉट येथील रेड डोअर कॅफेमध्ये बसून असलेल्या दोघांकडून शनिवारी रात्री उशिरा जप्त केल्या. पुणे जिल्ह्यातील दोंड व खामगाव येथील बाळापूर फैलमधील रहिवासी अशा एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.पुणे जिल्ह्यातील दोंड येथील रहिवासी सूरज सुनील सोनवणे (२५) व बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाळापूर फैलातील रहिवासी प्रकाश नथ्थुजी मोरे (३५) हे दोघे चलनातून बाद झालेल्या नोटा घेऊन न्यू राधाकिसन प्लॉट येथील एका कॅफेत बसलेले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकासह धाव घेऊन या कॅफेतील संशयितांची तपासणी सुरू केली असता प्रकाश मोरे व सूरज सोनवणे या दोघांच्या हालचालीवरून त्यांच्याकडे नोटा असल्याचा कयास पोलिसांनी लावला. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र त्यानंतर दोन्ही आरोपींनी चलनातून बाद झालेल्या नोटा बॅगेत असल्याची कबुली देताच पोलिसांनी त्यांच्याकडून चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या १४६ नोटा म्हणजेच एक लाख ४६ हजार रुपये आणि ५०० रुपयांच्या २ हजार ७०८ नोटा म्हणजेच १३ लाख ५४ हजार रुपये अशा एकूण १५ लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या. दोन्ही आरोपींविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या स्पेसिफिक बँक नोटा अॅक्टच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे, रणजितसिंह ठाकूर, शक्ती कांबळे, मनोज नागमते, भावलाल हेंबाडे यांनी केली.