मुंबई : मुंबई पोलिसांचीअमली पदार्थांविरोधातील मोहीम सुरू असून बुधवारी रात्री अँटॉप हिल परिसरातून तिघा जणांना अटक करून त्यांच्याकडून १६ किलो १०० ग्रॅम वजनाचे मेथँक्युलाँन ड्रग्ज जप्त केले. या नशिल्या पदार्थांची किंमत १६ कोटी १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-१ च्या पथकाने ही कारवाई केली. इम्रान इकबाल जलोरी (४०), अमजद हमीद खान (४२) व असीफअली मोहम्मद अरब (४०, तिघे रा. मेस्त्री रोड, कसबा कमिटी, अँटॉप हिल) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. या ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये गुंतलेल्या अन्य आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहर व उपनगरात मेथँक्युलॉनची विक्री करण्यासाठी तिघे जण बुधवारी रात्री अँटॉप हिल येथील कल्पक इस्टेटजवळील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमजवळ येणार आहेत, अशी माहिती युनिट-१चे प्रभारी पंढरीनाथ पाटील यांना मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांसमवेत त्याठिकाणी सापळा रचून रात्री साडेनऊच्या सुमारास तिथे संशयास्पदरीत्या फिरताना आढळलेल्या तिघांना पकडले. त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत १६.१०० किलो अमली पदार्थ आढळले.