हैदराबाद - तेलंगणातील एका ज्योतिषाच्या घरातून तब्बल 18 कोटी रुपयांच्या नकली नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. आपल्या घरी चोरी झाल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासातच त्याचा भांडाफोड झाला आहे. मुरलीकृष्ण शर्मा असं या ज्योतिषाचं नाव असून हैदराबादच्या नगोल येथील रहिवाशी आहे. शर्मा याने टिव्ही चॅनेलवरुन माणिक रत्नविक्री आणि ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर, 2019 मध्ये नकली नोटांचा हवाला धंदा सुरू केला. यापूर्वीही बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने 90 कोटी रुपयांची अफरातफरी केल्याप्रकरणी सीबीआयने त्यास अटक केली होती. मात्र, जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याने आपला हवाला नोटांचा धंदा सुरू केला. नुकतेचा, या ज्योषिषाच्या घरी चोरी झाली. या चोरीचा तपास करताना पोलिसांनी त्याचा नकली नोटांचा गोरखधंदा उघडकीस आणला.
हैदराबाद क्राईम ब्रँच आणि एलबी नगर पोलिसांनी 18 कोटी रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. यातील आरोपी ज्योतिषाचे नाव बेलमकोंडा मुरलीकृष्ण शर्मा असे आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. 15 जून रोजी शर्मा याने एल. बी. नगर भागातील पोलीस ठाण्यात घरातील 40 लाख रुपये किंमतीचे रत्न खडे चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. त्यावेळी, पवनकुमार नावाचा व्यक्ती, जो बेलमकोंडा याचा अगोदरचा सहकारी होता.
पवनकुमारला बेलमकोंडा याच्या लक्झरीयस लाईफची आणि संपत्तीची भुरळ पडली होती. त्यामुळे, त्याने मूळ गावाकडील मित्रांना बोलावून 14 जून रोजी रात्री ज्योतिषाच्या घरी चोरी केली. घरातील 2 ट्रॉली बॅग त्यांनी चोरून नेल्या होत्या. मात्र, हैदराबादच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना बॅगेतील फक्त 16 नोटा म्हणजे 32 हजार रुपये खरे असून इतर नोटा बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे, त्यांनी नकली नोटा जाळून टाकल्या अन् गुंटूरमधील आपल्या मूळगावी निघून गेले. पवनकुमारने ही खरी स्टोरी तपासात सांगितल्याचे राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी सांगितले.
पोलिसांनी अधिक तपास केला असता, शर्मा याच्या यापूर्वीच्या 90 कोटी रुपयांच्या अफरातफरीच्या गुन्ह्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपासाची चक्रे ज्योतिषाच्या दिशेनेच गतीमान झाल्यानंतर शर्माच्या हवाला धंद्याचा पर्दाफाश झाला. त्याकडून, 17 कोटी 72 लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांना मिळाल्या, यासोबतच 6 लाख 32 हजार कॅश आणि 10 मोबाईल फोनही तेथून जप्त केल्याचे भागवत यांनी सांगितले.