लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: एका मालवाहू वाहनातून अकोलाकडे जात असलेला तब्बल १७ लक्ष रुपयांचा गुटखा शहर पोलिसांनी नाकाबंदी करून शुक्रवारी सायंकाळी पकडला. या कारवाईत आठ लाख रुपयांच्या मालवाहू वाहनासह २५ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव शहरातील गुटखा माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. खामगाव शहरातील लंकडगंज भागातून भुसावल चौक मार्गे अकोलाकडे जात असलेल्या एका वाहनातून प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी गौतम चौक आणि परिसरात नाकाबंदी केली. त्यावेळी एमएच १९ झेड ४२७९ या क्रमांकाच्या वाहनातून चालक गणेश रामहार भोई(४०) रा. एसी मोहल्ला वार्ड नंबर ८, शहापूर जि. बºहाणपूर(मध्यप्रदेश) याच्या ताब्यातून मोठ्याप्रमाणात गुटखा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये पान मसाल्याचे १३ लक्ष ६६ हजार ८०० रुपयांचे ११ हजार ३९० पाकीट आणि ३ लाख ४१ हजार ७०० रुपये किंमतीचा सुंगधित तंबाखू आणि ८ लक्ष रुपये किंमतीचे मालवाहू वाहन असा एकुण २५ लक्ष ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर, पोलिस उपनिरिक्षक गौरव सराग, सम्राट ब्राम्हणे, पोहेकॉ अरूण हेलोडे, गजानन बोरसे, नापोकॉ सूरज राठोड, संतोष वाघ, पो.कॉ दीपक राठोड, प्रफुल्ल टेकाडे, जितेश हिवाळे, अमरदिपसिंह ठाकूर, अनंता डुकरे यांनी ही कारवाई केली.
नाकाबंदीनंतर केली कारवाई!- गत काही दिवसांपासून शहरातील गुटखा माफीयांना शहर पोलिसांकडून लक्ष्य केल्या जात आहे. शहरात विविध ठिकाणी गुटखा जप्त करण्याची कारवाई सुरू असतानाच शुक्रवारी सायंकाळी नाकाबंदी करून शहर पोलिसांनी पुन्हा मोठ्याप्रमाणात गुटखा साठा जप्त केला.