मुंबई - लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून संपर्कात आलेल्या अमेरिकेतील तोतया अभियंत्याने 17 लाख रुपयांचा गंडा महिलेला घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी ठाण्यातून एका आरोपीला अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. निखील कुमार सिंग असे अटक आरोपीचे नाव असून याप्रकरणी आणखी दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
आरोपीने पाठवलेल्या ईमेलच्या सहाय्याने आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने अनेक ईमेल या महिलेला पाठवल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दादर येथे राहणाऱ्या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी 29 जानेवारीला सायबर पोलिसांनी भा. दं. वि. कलम 419, 420, 34 सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याच्या कलम 66 (क) व 66 (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मे, 2018 मध्ये आरोपी घटस्फोटीत तक्रारदार महिलेच्या संपर्कात आला. डॅनिज नावाच्या प्रोफाईलमधील व्यक्तीने आपण टेक्सासमध्ये अभियंता म्हणून काम करणारा असून त्याने लग्न करण्यास होकार दिला. सुरूवातीला ईमेल व त्यानंतर व्हॉट्स ऍपवरून दोघांमध्ये संभाषण होऊ लागले. त्यावेळी आरोपीने आपण मुंबईत येणार असल्याची तक्रारदार महिलेला सांगितले. त्यावेळी त्याने आपले बॅंक खाते बंद झाल्याचे सांगून आठ लाख आठ हजार रुपयांची मागणी केली. तिने आरटीजीएस मार्फत ती रक्कम आरोपीला दिली. त्यानंतर मित्राला ऑस्ट्रेलियामध्ये अपघात झाल्याचे सांगून आणखी रक्कम मागितली. अशा पद्धतीने आरोपीने तक्रारदार महिलेकडून 17 लाख रुपये लुबाडल्यानंतर महिलेने आरोपीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीचा दूरध्वनी बंद असल्याचं निष्पन्न झालं. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली.