लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारागृहांतून पॅरोलवर (अभिवाचन रजा) सोडण्यात आल्यानंतर कारागृहात न परतलेल्या १८ कैद्यांना मुंबई पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कैद्यांची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात आली आहे.
कोरोनाकाळात या रोगाचा प्रादुर्भाव कारागृहांपर्यंत पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाच्या आदेशाने कैद्यांना कोरोना पॅरोल देण्यात निर्णय घेण्यात आला होता. कैद्यांना सुरुवातीला सुमारे ४५ दिवस एवढ्या कालावधीची पॅरोल रजा जाहीर करण्यात आली. त्यानंतर, मे २०२० रोजीची अधिसूचना रद्द करेपर्यंत ३० दिवसांच्या प्रमाणामध्ये त्यात वाढ करण्यात आली होती.
कोरोनाच्या लाटा ओसरून परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर फेब्रुवारी २०२२ रोजी कैद्यांची सुट्टीची अधिसूचना रद्द करण्यात आली. त्यांना पुन्हा कारागृहात येण्यास सांगितले. मात्र, कैदी परतले नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, मुंबईचे कायदा व सुव्यवस्था सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चाैधरी यांनी विशेष मोहीम राबविण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी १८ कैद्यांना पकडले आहे. तर, मुंबई पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांत विशेष मोहीम राबवत १९३ पाहिजे आणि ९५ फरारी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.