अंबरनाथ - अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीमधील व्हर्टीव्ह एनर्जी प्रा. लिमिटेड या कंपनीत एकाच वेळी 18 कामगारांना विषबाधा झाल्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र या कामगारांमधील 10 कामगारांना किरकोळ त्रस झाल्याने त्यांना उपचार करुन सोडण्यात आले तर उर्वरित आठ जणांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या कामगारांना विषबाधा झाली नसून जंतूसंसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
व्हर्टीव्ह एनर्जी प्रा. लिमिटेड या कंपनीत काल सायंकाळी हा प्रकार घडला. या कंपनीत 600 कामगार काम करित असून त्यातील 18 कामगारांना मळमळने, उलटय़ा होणे असा त्रस जाणवत होता. त्यातील 10 कामगारांवर कारखान्यातील डॉक्टरांनीच उपचार करुन त्यांना घरी सोडले. तर उर्वरित 8 कामगारांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना अंबरनाथच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्या कामगारांना कशामुळे त्रास झाला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. दुपारच्या जेवणातून हा त्रास झाल्याची शक्यता सुरुवातीला वर्तविण्यात येत होती. मात्र, 600 कामगारांपैकी अवघ्या 18 जणांना त्रास झाल्याने अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता धुसर झाली आहे. मात्र, कामगारांना झालेल्या त्रसाबाबत कंपनी स्तरावर चौकशी सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी देखील चौकशी सुरु केली आहे. कामगारांना नेमका जेवणातून त्रास झाला की कंपनीतील पाण्यातून त्रास झाला हे तपासण्यात येत आहे. कंपनीतील जेवण आणि पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे.
ज्या कामगारांवर उपचार सुरु आहेत. त्यातील यागेश डोळे, पुरुषोत्तम पाटील, हर्षद गायकवाड, आनंद चिडे, रोहदास डायरे, आशुतोष पॉल, नरेंद्र राऊत आणि संग्राम नायर यांची प्रकृती स्थिर आहे. कंपनीचे वरिष्ठ संचालक विपीन रत्नपारखी आणि संचालक मंगेश सावंत यांनी देखील कामगारांच्या प्रकृतीची चौकशी केली असून या कामगारांवर कंपनीमार्फत उपचार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच असा प्रकार पुन्हा घडणार नाही या अनुषंगाने कार्यवाही केली जात असल्याचे कंपनीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.