मीरारोड - घरबसल्या ऑनलाईन रिव्ह्यू व टास्क पूर्ण करून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी भाईंदरच्या एका व्यक्तीला तब्बल १९ लाखांना फसवले आहे .
भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट, न्यू सोनम कावेरीमध्ये राहणारे आशुतोष सिन्हा ( ४३ ) यांना व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी व्यक्तीने संदेश पाठवून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रति रिव्ह्यू ५० रुपये मिळतील. रोज २२ टास्क प्रमाणे महिना सुमारे २० हजार कमवाल असे कळवले. त्यानुसार सिन्हा यांनी होकार दर्शवला.
सुरवातीला विविध लिंक पाठवून केलेल्या टास्क आणि रिव्ह्यूचे सिन्हा यांना थोडे पैसे देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. नंतर त्यांना पैसे भरण्याचे टास्क देण्यात आले. त्याप्रमाणे त्यांनी विविध खात्यांवर पैसे जमा केले. नंतर त्यांना भरलेले पैसे परत हवे असतील तर आणखी टास्क पूर्ण करा सांगितले .
त्याप्रमाणे सिन्हा यांनी थोडे थोडे करून एकूण १९ लाख १७ हजार रुपये विविध बँक खात्यात जमा केले. परंतु पैसे काही परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी ४ सप्टेंबर रोजी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुशीलकुमार शिंदे अधिक तपास करत आहेत .