नवी दिल्ली - 1984 साली झालेल्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले काँग्रेसचा माजी नेता सज्जन कुमारनं गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला कड़कड़डूमा कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. यानंतर मंडोली कारागृहात कुमारची रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर आज सज्जन कुमारनं तब्येतीचं कारण देत सुप्रीम कोर्टात जामिनासाठी धाव घेतली आहे. सध्या सज्जन कुमार जन्मठेपेची शिक्षा कारागृहात भोगत आहे.
सज्जनला मंडोली कारागृहात बॅरेक क्रमांक 14 मध्ये त्याला ठेवण्यात येणार होते. १७ डिसेंबर रोजी दिल्ली हायकोर्टानं सज्जन कुमारला शीखविरोधी दंगलीप्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिवाय, गेल्या वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेशही दिले होते. यानंतर, दरम्यान, सज्जन कुमारनं आत्मसमर्पण करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज नवी दिल्ली हायकोर्टात केला होता. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी कोर्टाकडे आत्मसमर्पणाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळून लावला आणि ३१ डिसेंबर रोजीच आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. गेल्या वर्षी १७ डिसेंबरला दिल्ली हायकोर्टानं शीखविरोधी दंगलीप्रकरणात ऐतिहासिक निर्णय देत सज्जन कुमारला दोष ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ३४ वर्षांपूर्वी झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात सज्जन कुमारला शिक्षा सुनावण्यात आली. त्याआधी याच प्रकरणात त्यांची मुक्तता झाली होती. १ नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीच्या राज नगर भागात पाच शिखांची हत्या झाली होती. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं सज्जन कुमारची सुटका केली. या निकालाला सीबीआयनं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. दिल्लीच्या कँटॉनमेंटच्या अगदी समोर ही घटना घडली, त्यावेळी प्रशासन नेमकं काय करत होतं, असा प्रश्न सुनावणीवेळी न्यायालयानं विचारला होता.