मंगेश कराळे -नालासोपारा - माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ डिसेंबर २००७ साली आर्थिक व्यवहाराच्या वादातून एकाची हत्या करून त्याचा मृतदेह झाडा झुडपात टाकून दिल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तब्बल १६ वर्षांनी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने दोन्ही आरोपी भावांना उत्तराखंड राज्यातून २० मार्चला अटक केले. दोन्ही आरोपी भावांचा ताबा तपास व चौकशीसाठी माणिकपूर पोलिसांना गुन्हे शाखेने दिला आहे.
१३ डिसेंबर २०१७ साली सकाळी मुंबई-अहमदाबाद हायवेला गुरुकृपा हॉटेलच्या समोर, कर्नाल पाडा गावाकडे जाणा-या रोडच्या बाजुला आरोपीनी अज्ञात कारणावरुन एका अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील पुरुषाची हत्याराने जीवे ठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह झाडीझुडपात टाकुन दिले होते. त्यावेळी माणिकपुर पोलिसांनी हत्या व हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तपासा दम्यान पोलिसांनी गुन्हयातील मयताची ओळख संजय विनोद झा (३२) असे निष्पन्न करून ते गारमेंट फॅक्टरीमध्ये प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम करत होते. मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध गंभीर गुन्हयातील पाहिजे व फरार निष्पन्न परंतु नजरेआड असणारे आरोपीत यांचा शोध घेवून अटक करण्याबाबत वरिष्ठांनी सुचना व मार्गदर्शन केले होते.
वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाव्दारे प्राप्त माहितीचे आधारे आरोपी पुरणसिंग प्रतापसिंग उन्योनी ऊर्फ पुरणसिंग कापुरसिंग परिहार (४१) आणि मोहनसिंग प्रतापसिंग उन्योनी ऊर्फ मोहनसिंग कापुरसिंग परिहार (३८) या दोन्ही आरोपी सख्या भावांना उत्तराखंडातील बागेश्वर येथून २० मार्चला ताब्यात घेतले होते. आरोपीकडे अधिक तपास केला असता आरोपीनी त्याचे साथीदारांसोबत संजय झा याचेशी झालेल्या आर्थिक व्यवहाराच्या वादातुन हत्या केल्याचे कबूल केले आहे. सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मुकेश तटकरे, शंकर शिंदे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव, संतोष चव्हाण यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.