मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या २ आरोपींना अटक करून ७ गुन्हे उघडकीस आणण्यात वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी सोमवारी दिली आहे.
सातीवलीच्या धुरी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गाळ्यातून १७ जूनला रात्री चोरट्याने प्लास्टिक वस्तू बनविण्याच्या ४० हजार रुपये किंमतीच्या दोन लोखंडी डाय चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी कंपनी मालक वेदप्रकाश व्यास (६३) यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. वसई विरार परिसरात घरफोडी, चोरी व वाहन चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन वरिष्ठांनी घरफोडी, चोरी व वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत आदेश दिले होते.
वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सचिन सानप व गुन्हे प्रकटीकरण पथकाने सलग १० दिवस सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे शोध मोहिम राबवून आरोपीची माहीती प्राप्त केली. खानिवडे परिसरामध्ये सापळा रचून आरोपी आकाश कदम आणि साजन वळवी या दोघांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपीकडे सखोल तपास केल्यावर त्यांनी वसई पूर्व परिसरातून चोरी केलेल्या ३ दुचाकी, ५ सायकल, सोन्याची दागिने व रोख रकमेसह इतर मुद्देमाल असा एकूण १ लाख ५१ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.