मुंबई : कांदिवली येथील लालजीपाड्यात गजबजलेल्या रस्त्यावर सशस्त्र जमावाने दोन पुजाऱ्यांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. प्रथम दिगंबर खिल्लारे (२२) आणि छोटू मणियार (२२) अशी या अटक केलेल्यांची नावे असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार पुजारी आशिषकुमार दुबे (३४) हे १७ ऑगस्ट रोजी रात्री १०:४५ च्या सुमारास इराणीवाडीमधील घरी पूजापाठ करून मेव्हणा अजित अग्निहोत्री यांच्यासोबत स्कूटरने घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अनोळखी मोटरसायकलस्वाराने धडक मारल्याने ते दोघेही जमिनीवर पडले. त्यांनी मोटरसायकलस्वाराला जाब विचारताच तो धक्काबुक्की करत तेथून निघून गेला. या अपघातात दुबे यांच्या पायाला मार लागून सूज आली होती. त्यामुळे ते काही वेळ फुटपाथवर बसले आणि पुन्हा मेहुण्यासोबत दुचाकीने घरी निघाले.
त्यानंतर रात्री ११ वाजता लालजीपाड्यानजीक अभिलाख जंक्शन सिग्नल जवळ दुबे यांना धडक देणारी व्यक्ती मोटरसायकल घेऊन आली. त्याने ‘तू मला मारहाण का केली’ अशी विचारणा करत सोबत आलेल्या तीन तरुणांसह दुबे आणि त्यांच्या मेव्हण्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील हल्लेखोरांपैकी एकाने खिशातून चाकू काढत दुबे यांच्यावर हल्ला केला. त्यातील एकाने लाकडी बांबूने दोघांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. त्यानुसार कांदिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सदाशिव सावंत आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने दुबे यांनी तपास सुरू केला.
अन्य आरोपींसाठी शोधपथकरुग्णालयातून उपचार घेऊन दुबे यांनी पत्नीसह घर गाठले. पोलिसांनी त्यांना संपर्क केला असता ते गुन्हा दाखल करण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ ऑगस्ट रोजी त्यांचा जबाब घेत पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याचे कलम १०९, ११५(२), ११८(१), २२६(१), २८१,३(५) अंतर्गत हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यातील दोन हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.