लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : बनावट ई-मेलद्वारे दोन कंपन्यांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही कंपन्यांच्या व्यवहाराशी संबंधित कंपन्यांचे मिळतेजुळते ई-मेल वापरून त्यांना एकूण अडीच कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीडी व तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापे व सीबीडी येथील दोन कंपन्यांना अज्ञाताने सुमारे अडीच कोटींचा गंडा घातला आहे. महापे येथील आर. आर. टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस या कंपनीची दोन कोटींची फसवणूक झाली आहे.
ही कंपनी विदेशातून प्रयोगशाळेशी संबंधित उपकरणे मागवून त्याची भारतात विक्री करते. यानिमित्ताने त्यांचे अमेरिकेतील लिको कॉर्पोरेशन कंपनीसोबत सप्टेंबर महिन्यात व्यवहार झाला होता. त्याचे ५ कोटी (२,६१,८५१ डॉलर) रुपये देणे बाकी होते. ही रक्कम लिको कंपनीच्या मूळ जुन्या खात्यावर न पाठवता नव्या खात्यावर पाठवण्याच्या सूचना आर. आर. टेक्नॉलॉजीचे जनरल मॅनेजर व्ही. जयकुमार यांना ई-मेलवर मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ई-मेलमधील नमूद अमेरिका येथील बँक खात्यात २ कोटी रुपये पाठवले होते. त्यानंतर पुन्हा बँक खाते बदलण्यात आल्याच्या सूचना ई-मलेवर मिळाल्याने कंपनीला संशय आला. यामुळे त्यांनी लिको कंपनीकडे चौकशी केली असता, त्यांना रक्कम मिळाली नसून त्यांनी कोणताही ई-मेल केला नसल्याचे समोर आले. त्यानुसार फसवणूक प्रकरणी त्यांनी केलेल्या तक्रारीवरून तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे सीबीडी येथील रायडर शिपिंग या कार्गो कंपनीची ३८ लाखांची फसवणूक झाली आहे. या कंपनीला चीनमधील एका कंपनीला ३८ लाखांचे देणे होते.
३८ कोटी पाठवले, पण मिळालेच नाहीत
चीनच्या कंपनीच्या नावे बनावट ई-मेल करून त्याद्वारे सीबीडी येथील कंपनीला संपर्क साधण्यात आला. त्यामध्ये नेहमीच्या खात्याऐवजी नव्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार कंपनीने सुमारे ३८ लाख रुपये पाठवले होते. मात्र, काही दिवसांतच त्या कंपनीला ती रक्कम मिळाली नसून अज्ञाताने ती स्वतःच्या खात्यात वळवून घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी कंपनीने केलेल्या तक्रारीवरून सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.