लोकमत न्यूज नेटवर्कनवीन पनवेल : खरेदी केलेल्या फ्लॅटचा मुदतीत ताबा दिला नाही व फ्लॅट खरेदीसाठी केलेल्या ‘ॲग्रीमेंट फॉर सेल’मधील तरतुदीचा अप्रामाणिकपणे भंग करून फ्लॅट खरेदीपोटी दिलेल्या दोन कोटी ४५ लाख ५७ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेक्टर ६, वाशी येथील सोमेश प्रशांत कुमार बॅनर्जी यांनी २०१५ मध्ये तळोजा फेस टू, सेक्टर २६ येथे अर्जुन रेसिडेन्सी या प्रोजेक्टवर गेले असता, त्यांना सात मजल्याचे बांधकाम पूर्ण झाल्याचे दिसले. यावेळी बिल्डर विजय भतीजा यांनी प्रोजेक्ट रेरा रजिस्टर असून, विविध प्राधिकरणांच्या परवानग्या प्राप्त झाल्याचे सांगितले व २०१६ मध्ये प्रोजेक्ट पूर्ण करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे बॅनर्जी यांनी वन बीएचके फ्लॅट बुक करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी एक लाख ४० हजार रुपये दिले. फ्लॅटचे ॲग्रीमेंट करण्यात आले. त्यानंतर, फ्लॅटवर होम लोन घेतले. तत्पूर्वी एप्रिल, २०१५ मध्ये बॅनर्जी यांनी भतीजा यांच्या व्हीएम इन्फ्रा, शहापूर येथे रुबी नावाच्या दुसऱ्या बिल्डिंग प्रोजेक्टमध्ये वन बीएचके फ्लॅट बुकिंगपोटी ४ लाख वीस हजार दिले होते. शहापूर येथील बुकिंग रद्द करून ही रक्कम अर्जुन रेसिडेन्सी या प्रोजेक्टमध्ये गुंतविण्यात आली.
फ्लॅटच्या खरेदीपोटी विजय भतीजा यांना एकूण २४ लाख ९६ हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर जून, २०१८ मध्ये बिल्डिंगमधील फ्लॅट ४०४ साठी होम लोनची रक्कम व इतर असे एकूण २२ लाख ३२ हजार ३९५ रुपये देण्यात आले. बॅनर्जी यांनी भतीजा यांना असे एकूण तीन फ्लॅटच्या खरेदीपोटी ५१ लाख २१ हजार २९५ इतकी रक्कम दिलेली आहे.
दुसऱ्या प्रकल्पात वापरले पैसेअर्जुन रेसिडेन्सी या बिल्डिंग प्रोजेक्टमध्ये फ्लॅटच्या खरेदीपोटी बॅनर्जी यांच्यासह सात व्यक्तींनी मिळून एकूण दोन कोटी ४५ लाख ५७ हजार २६१ इतकी रक्कम बिल्डर भतीजा यांना दिली आहे. त्यांनी मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही व खरेदीपोटी दिलेले पैसे भतीजा याने त्याच्या इतर दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये वापरलेले आहेत.