पुणे : बुधवार पेठेतील इलेक्ट्रोनिक्स बाजारपेठेत दुकान थाटून तेथील व्यापाऱ्यांकडून उधारीवर माल घेऊन तो विकून २ कोटी ४६ लाख रुपये न देता पती पत्नी फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. प्रल्हाद लक्ष्मण हरियानी, जान्हवी हरियानी, सुनिल श्रीचंद हरियानी, अनिल श्रीचंद्र हरियानी (सर्व रा़. मीरा सोसायटी, शंकरशेठ रोड) अशी त्यांची नावे आहेत़. याप्रकरणी इंडियन केबल्स अँड इलेक्ट्रिकल्स प्रा.लि.चे मालक सुरेश शिवनदास जेठवानी (वय ५६, रा. कोरेगाव पार्क) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियानी यांचा इलेक्ट्रिक साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. जेठवानी बुधवार पेठ भागातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री बाजारातील मोठे व्यावसायिक आहेत. गेल्या आठ वर्षांपासून हरियानी यांनी त्यांच्याकडून लॉर्ड इलेक्ट्रीकल्स या फर्मचे नावावर १ कोटी ५३ लाख ४ हजार आणि जे़ पी़ इलेक्ट्रो इंटरप्रायझेस या फर्मच्या नावार ९३ लाख ८३ हजार रुपये असे २ कोटी ४६ लाख ८७ हजार रुपयांचे साहित्य घेतले होते. त्यासाठी त्यांनी पोस्ट डेटेड चेक्सही दिलेले आहेत़. उधारीवर घेतलेल्या साहित्याचे पैसे हरियानी यांनी चुकते केले नाही. याबाबत जेठवानी यांनी त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, आरोपींकडून सबब सांगण्यात येत होते. या फर्म प्रल्हाद हरियानी यांच्या नावावर आहे़ मात्र, त्यांचे म्हणणे असे की फर्म जरी माझ्या नावावर असली तरी प्रत्यक्ष व्यवहार अनेक वर्षांपासून त्यांचे भाऊ पाहत आहेत़. त्याच्याशी माझा संबंध नाही़ ते व्यवहार आपण केले नाहीत़. दुसरीकडे त्याचे भाऊ गेल्या काही महिन्यांपासून दुकान बंद करुन पळून गेले आहेत़. शेवटी जेठवानी यांनी पोलिसांकडे धाव घेतली़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे अधिक तपास करत आहेत़.
उधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 3:05 PM
बुधवार पेठेतील इलेक्ट्रोनिक्स बाजारपेठेत दुकान थाटून तेथील व्यापाऱ्यांकडून उधारीवर माल घेऊन तो विकून २ कोटी ४६ लाख रुपये न देता पती पत्नी फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़.
ठळक मुद्देफरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद, दुकानदार पत्नीसह फरार