लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बीएआरसी मध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीची १ कोटी ९२ लाखाची फसवणूक झाली आहे. कामाच्या ठिकाणी मोबाईल वापराला अनुमती नसल्याने या अधिकाऱ्याचा मोबाईल घरीच होता. यावेळी पत्नी पतीचा मोबाईल चाळत असताना नजरेस पडलेल्या लिंकला भुलून त्यांनी ही रक्कम गमावली आहे.
पतीच्या पश्चात पतीचा मोबाईल चाळणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. पनवेल परिसरात राहणाऱ्या या महिलेचे पती बीएआरसीमध्ये अधिकारी आहेत. कामाच्या ठिकाणी मोबाईल आणण्यास मनाई असल्याने पतीचा मोबाईल घरीच असतो. दोन महिन्यांपूर्वी पत्नी पतीचा मोबाईल हाताळत असताना रितू व्होरा नावाच्या महिलेचा मॅसेज पत्नीच्या नजरेस पडला. यामुळे त्यांनी मॅसेज वाचला असता त्यामध्ये ट्रेडिंगद्वारे होणाऱ्या नफ्याची माहिती दिली होती. त्यावर विश्वास ठेवून महिलेने ६० लाख गुंतवले होते. त्यामधून १२ लाखाचा नफा झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे आपला फायदा होत असल्याचे समजून त्यांनी दोन महिन्यात टप्प्या टप्प्याने तब्बल १ कोटी ९२ लाख रुपये संबंधितांच्या खात्यावर जमा केले होते. इंदिरा सिक्युरिटी या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे त्यांच्याकडून ही रक्कम घेण्यात आली होती. परंतु दोन महिने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले नव्हते.
दरम्यान २ फेब्रुवारीला तेलंगणा येथे फसवणूक झाल्याची तक्रार एका व्यक्तीने केली होती. त्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरु असताना गुन्हेगारांच्या खात्यावर या महिलेची देखील मोठी रक्कम आल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता फसवणूक झाल्याची जाणीव त्यांना झाली.