नई दिल्ली: बस प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या एका टोळीला दक्षिण दिल्लीतून पोलिसांनी अटक केली. या टोळीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना अतिशय चक्रावून टाकणारी माहिती मिळाली. आपली टोळी नसून कंपनी आहे आणि या कंपनीचा भाग असणाऱ्या सर्वांना अगदी मल्टीनॅशनल कंपनीप्रमाणे सुविधा दिल्या जातात, अशी माहिती टोळीच्या प्रमुखानं पोलिसांना दिली. टोळीतील प्रत्येकाला टार्गेट पूर्ण केल्यावर म्हणजेच मोबाईल चोरल्यावर दररोज वेतन दिलं जातं. याशिवाय आठवड्यातून दोन सुट्ट्यादेखील दिल्या जातात, अशी आपल्या कामाची पद्धत असल्याचं टोळीच्या प्रमुखानं पोलिसांना सांगितलं. 'प्रत्येकाला मोबाईल चोरण्याचं टार्गेट पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात येते. आठवड्यातून पाच दिवस काम करावं लागतं. शनिवार-रविवार सुट्टी असते. कंपनीत नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवसाला 500 रुपयांचा पगार दिला जातो. याशिवाय नॉन व्हेज आणि दारुदेखील देण्यात येते,' अशी माहिती टोळीचा प्रमुख असलेल्या सरदार चमल लालनं पोलिसांनी दिली. चमन लालचा उजवा हात असलेल्या बोपी विश्वासनं ओम प्रकाश आणि ज्ञानेश या दोघांना त्यांच्या कंपनीत नोकरी दिली होती. याशिवाय आणखीदेखील काहीजणांचा या कंपनीत समावेश असण्याची शक्यता आहे. ही टोळी महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये सर्वाधिक काम करायची. दिल्लीतल्या कोणत्याही भागातून ते मोबाईल लंपास करायचे. मात्र एमबी रोडपासून बदरपूर, कालका मंदिरपासून आनंदमयी रोड, आऊटर रिंग रोडवर धावणाऱ्या डीटीसी बसेसमध्ये सर्वाधिक चोऱ्या केल्या जायच्या. ही टोळी दिवसाकाठी सात ते आठ मोबाईल लंपास करायची, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अशीही 'कंपनी'; मोबाईल चोरल्यास 2 दिवस सुट्टी अन् टार्गेट पूर्ण केल्यावर 500 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 11:31 AM