ठाणे : अवघ्या २० हजारांच्या ऐवजासाठी ठाण्यातील कोलशेत लोढा अमारा इमारतीच्या कंपाऊंडमध्ये शिरलेल्या आठ ते दहा जणांच्या दरोडेखोरांच्या टोळक्याने दोन सुरक्षा रक्षकांवर तलवार आणि लोखंडी सळईने खुनी हल्ला केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
ठाण्यातील कोलशेत परिसरात लोढा अमारा इमारती कंपाउंड परिसरात २५ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास हे थरारनाट्य घडले. दरोडेखोरांच्या टोळक्याने इमारतीच्या कंपाउंडचा पत्रा तोडून इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिथल्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दरोडेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या टोळीने सुरक्षा रक्षकांवर तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यात देवनाथ पांडे या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर आणि हातावर रॉडने प्रहार करण्यात आला. तर एका दरोडेखोराने देवनाथ यांच्या तळहातावर तलवारीने वार करून त्यांना जबर जखमी केले. दुसरे सुरक्षा रक्षक विनयकुमार पांडे यांच्यावरही या टोळक्याने हल्ला केला. त्यांच्याही डोक्यावर त्यांनी रॉडने वार केले. त्यानंतर या टोळीने इमारतीच्या आवारातून ॲल्युमिनियमच्या २० हजार रुपयांच्या शीट लुटून पळ काढला. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध दरोड्यगचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. या हल्ल्यात जखमी सुरक्षा रक्षकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मोसमकर हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.