सहारनपूर – देवबंदमधील सहारनपूर – मुजफ्फरनगर राज्य महामार्गावर गुरुवारी साखन कालव्याजवळ वेगवान दुचाकी रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या डंपरला धडकली. या दुर्घटनेत दुचाकीवर स्वार असलेल्या २ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. सूचना मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले. मात्र या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तलहेडी पोलीस स्टेशन हद्दीतील अंबोली रहिवासी २२ वर्षीय नितीन आणि २० वर्षीय आशिष नौटियाल दुचाकीवरुन क्लासला जात होते. गुरुवारी दुपारी जवळपास २.३० च्या सुमारास सहारनपूर-मुजफ्फरनगर राज्य महामार्गावर गावात साखन कालव्याजवळ वेगवान दुचाकी नियंत्रण सुटलं. त्यानंतर दुचाकी रस्त्याकिनारी उभ्या असलेल्या डंपरला पाठिमागे धडकली. दोन्ही युवकांनी हेल्मेट घातलं नव्हतं. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहचले. दोन्ही युवकांचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले.
युवकाच्या मृत्यूची बातमी अंबोली गावात पोहचली तेव्हा कुटुंबीयासह गावावर शोककळा पसरली. गावकऱ्यांनी मृत युवकांच्या घराबाहेर गर्दी केली. दुर्घटनेत डंपर चालक घटनास्थळावरुन फरार झाला. अधिकारी रजनीश उपाध्याय म्हणाले की, मृत युवकांच्या कुटुंबीयांकडून कुठलीही तक्रार प्राप्त झाली नाही. ही दुर्घटना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने घडली. युवक विना हेल्मेट दुचाकी चालवत होते. जर दोघांनी हेल्मेट घातलं असतं तर कदाचित त्यांचा जीव बचावला असता.
दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना घरातील वंशाचे दोन दिवे अशाप्रकारे विझतील याची कल्पनाही कुणी केली नाही. विद्यार्थी नितीन आणि आशिष यांच्या दिर्घ आयुष्यासाठी आईंनी व्रत ठेवला होता. मात्र घरी दोघांच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
१ तास रुग्णवाहिका आलीच नाही
राज्य महामार्गावर गुरुवारी ही दुर्घटना घडली ज्यात अपघातानंतर दोन्ही युवक घटनास्थळावर तडफडत होते. त्यावेळी हायवेवरुन जाणाऱ्या लोकांनी तात्काळ १०८ नंबरवर फोन करुन रुग्णवाहिका बोलावली. जवळपास १ तासाने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. तोपर्यंत युवकांचा मृत्यू झाला होता. या प्रकाराने स्थानिक लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. जर जखमी युवकांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता असा आरोप स्थानिकांनी केला आहे.