केरळमध्ये नरबळी देणारे नरभक्षक असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 05:33 AM2022-10-13T05:33:19+5:302022-10-13T05:33:42+5:30
महिलांचे अवयव कापून रक्तस्त्राव होऊ देण्यात आला. एका मृतदेहाचे ५६ तुकडे करण्यात आल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले.
तिरुअनंतपुरम : केरळमधील एका जोडप्याने लवकर श्रीमंत होण्याच्या लालसेतून दोन महिलांचा नरबळी दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आणखी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नरबळीचा आरोप असलेल्या जोडप्याने बळींचे मांस खाल्ले असावे, असा धक्कादायक नवीन तपशील समोर आल्याचे एर्नाकुलमचे पोलीस आयुक्त सी. एच. नागराजू यांनी बुधवारी सांगितले.
मृत रोसेलीन, पद्मा यांना गळा दाबून मारण्यापूर्वी त्यांचा बांधून अतोनात छळ करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. महिलांचे अवयव कापून रक्तस्त्राव होऊ देण्यात आला. एका मृतदेहाचे ५६ तुकडे करण्यात आल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले.
मोहंमद शफी लैंगिक विकृत
मुख्य आरोपी मोहंमद शफी आहे. तो लैंगिक विकृत आणि कायम दुःखी राहणारा आहे. त्याने महिलांना भागवल सिंग आणि त्याची पत्नी लैला यांच्या घरी आणले. २०२० मध्ये एका ७५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात शफी जामिनावर बाहेर होता. शफीने यापूर्वीही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे केल्याचे पाेलिसांनी सांगितले.
चित्रपटात काम देण्याचे आमिष
शफीने पीडितांना एका अश्लील चित्रपटात काम करण्यासाठी पैसे देण्याचे वचन दिले होते. भागवल सिंग आणि लैला हे आर्थिक संकटात होते. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी शफीने आणि श्रीमंत होण्यासाठी नरबळी देण्याचा सल्ला दिला होता, असे पोलिसांनी सांगितले. त्यासाठी दाेन महिलांना ताे त्यांच्याकडे घेऊन गेला होता.
डॉक्टरचा राजकीय कनेक्ट?
मसाज थेरपिस्ट भागवल सिंग सत्ताधारी सीपीआय (एम) शी संबंधित आहेत, असा आरोप होत आहे. पक्षाने मात्र ते पक्षाचे सदस्य असल्याचे नाकारले आहे. ‘तो आमच्यासोबत काम करत होता, पण आमच्या पक्षाचा सदस्य नव्हता. त्याच्या दुसऱ्या लग्नानंतर तो धार्मिक व्यक्ती बनला. कदाचित त्याच्या पत्नीचा प्रभाव असेल,’ असे सीपीआयचे पीआर प्रदीप म्हणाले.
फेसबुकवरून झाला हाेता सर्वांचा संपर्क
शफी हा राेसेलीन आणि पद्मा यांच्याशी फेसबुकवरून संपर्कात आला हाेता. आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांना ताे जाळ्यात अडकवायचा. यासाठी ताे त्याच्या पत्नीचाही वापर करून घेत हाेता, असे तपासात उघड झाले आहे. याच माध्यमातून ताे भागवाल सिंह आणि त्याच्या पत्नीच्या संपर्कात आला हाेता.