औरंगाबाद : घराच्या कपाटात कोंडून ठेवलेल्या दोन वर्षांच्या बालिकेच्या रडण्याच्या आवाज ऐकून मदतीला धावलेल्या नागरिकांनी बालिकेची सुटका केल्याने अनर्थ टळला. हे कृत्य करणाऱ्या दारुड्याला नागरिकांनी बेदम चोप देत पाेलिसांच्या हवाली केले. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दलालवाडी येथे घडली. याप्रकरणी क्रांती चौक ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
शशिकांत दिलीप भदाने (३२, मूळ रा. मंगळूर, ता. अंमळनेर, जि. जळगाव, ह.मु, दलालवाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दलालवाडी येथील राठी यांच्या घरातील खोली भाड्याने घेऊन भदाने हा पंधरा दिवसांपूर्वी राहायला आला होता. येथे आल्यापासून तो सतत लहान मुलांना खाऊ देऊन त्यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास जवळच खेळत असलेल्या दोन वर्षीय बालिकेला त्याने उचलून त्याच्या खोलीत नेले. तिला कपाटात कोंडून बाहेरून कुलूप लावले. नंतर खोलीलाही कुलूप लावून तो दारू पिण्यासाठी निघून गेला. बालिका रडू लागली. बालिकेला खोलीत घेऊन जाताना जवळच्या एका मुलाने पाहिले होते. खोलीतून बालिकेच्या रडण्याचा आवाज येत होता. त्याने ही बाब नागरिकांना सांगितली. नागरिकांनी भदानेचा शोध घेतला, मात्र तो दिसला नाही. शेवटी त्यांनी खोलीचे दार तोडून पाहिले तेव्हा आलमारीतून रडण्याचा आवाज येत होता आणि आलमारीलाही कुलूप होते. कुलूप तोडून आलमारी उघडून गुदमरलेल्या बालिकेला मोकळ्या हवेत नेण्यात आले. दुसरीकडे बालिकेची आई, बहीण तिचा शोध घेत आलेे. नागरिकांनी बालिकेला त्यांच्या स्वाधीन केले व क्रांती चौक पोलिसांना कळविले. याच वेळी नशेत तर्र होऊन भदाने आला. भदानेला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.क्रांती चौक ठाण्याचे ठाणेदार घटनेविषयी अनभिज्ञघटनास्थळी मोठा जमाव जमला होता. भदाने त्या बालिकेसोबत काय करणार होता आणि त्याने तिला कशासाठी डांबून ठेवले, याबाबत उलटसुलट चर्चा घटनास्थळी करीत नागरिकांनी त्याला चोप दिला. पोलिसांनी त्याला सोडून देऊ नये, म्हणून नागरिक मोठ्या संख्येने क्रांती चौक ठाण्यात गेले होते. उपनिरीक्षक शिक्रे हे घटनेची तक्रार नोंदवून घेत होते. मात्र, पोलीस निरीक्षक डॉ. गणपतराव दराडे या घटनेविषयी अनभिज्ञ होते.