जयपूर - राजस्थान पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी एक मुलगी परीक्षेला बसली. यानंतर, जेव्हा तिचा निकाल आला तेव्हा ती मुलगी आनंदाने तिच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना ती आता सब इन्स्पेक्टर झाली आहे असं सांगते. त्यानंतर ही मुलगी पुढील दोन वर्षे राजस्थान पोलिस अकादमीमध्ये रितसर प्रशिक्षणासाठी जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पोस्टिंगची वेळ येते परंतु त्यावेळी झालेला एक खुलासा ज्यांने संपूर्ण पोलिस अकादमीमध्ये खळबळ उडते.
ती राज्याच्या एडीजींसोबत टेनिस खेळायची तर कधी माजी डीजीपीच्या मुलीच्या लग्नात पाहुणी म्हणून हजेरी लावायची. कधी कधी ती कुठल्यातरी कोचिंग सेंटरमध्ये जाऊन नवीन विद्यार्थ्यांना पोलीस परीक्षेत कसं उत्तीर्ण व्हायचं याचे ज्ञान देत असे. एकंदरीत तिचा रुबाब असा होता की, अगदी वरिष्ठ पोलीस अधिकारीही फसतील. तिला वाटेल तेव्हा ती खाकीचा धाक दाखवून अनेकांना गप्पगार करायची.
परंतु एके दिवशी तिचा रुबाब, पोलिसी धाक आणि खाकीच्या वर्दीमागील खरा चेहरा समोर आला तेव्हा अनेकांना धक्का बसला. ती पोलिस अधिकारी नसून एक नंबरची फ्रॉड मुलगी असल्याचे उघड झाले, जिने राजस्थान पोलिसांच्या अकादमी कमतरतेचा फायदा घेत दोन वर्षे तिने पोलिस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण खोट्या पद्धतीने घेतले एवढेच नाही, तर या प्रशिक्षणादरम्यान तिने पोलिस महिला असल्याचा बनाव केला होता. हे सत्य समोर आल्यावर ती ज्या लोकांच्या संपर्कात होती ते सगळे हैराण झाले.
काय आहे प्रकरण?
या २३ वर्षांच्या मुलीचं नाव आहे मोना बुगालिया. जिच्यावर आता खोटारडेपणाचा आरोप आहे. मोना ही नागौर जिल्ह्यातील निंबा येथील बास गावची रहिवासी आहे. इतर अनेक मुलींप्रमाणे मोनाचेही पोलिस गणवेश घालण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्नही तिने केला. तिने निरीक्षक भरती परीक्षेची व्यवस्थित तयारी केली. त्याची चाचणीही दिली. मात्र खूप प्रयत्न करूनही ती ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही. आणि इथूनच तिच्या मनात हे षडयंत्र रचण्याचे खुळ तयार झाले.
मोनाला स्वत:चे अपयश पचवता आले नाही आणि सब इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली नसतानाही तिने सब इन्स्पेक्टर भरती परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरवली आणि अनेकांकडून कौतुक करून घेतले. फक्त हे अभिनंदन आणि कौतुकाने तिला अशा वळणावर पोहचवले जिथून तिला परत येणे कदाचित शक्य नव्हते. मोनाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे आव्हानांशी झुंज देत यश संपादन करण्याचे बिरुदही तिच्या नावावर होते आणि मग मोना फसवणूक, बनावटपणा आणि गुन्हेगारीच्या मार्गावर गेली.
फसवणूक करून अकादमीत घेतला प्रवेश
राजस्थान पोलिस अकादमीच्या प्रशिक्षणातील अनियमिततेचा फायदा घेत तिने फसवणूक करून तेथे प्रवेश घेतला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिने तेथे दोन वर्षे पोलिस उपनिरीक्षक म्हणून प्रशिक्षण सुरू ठेवले. राजस्थान पोलिस अकादमीमध्ये उपनिरीक्षकांसाठी साधारणपणे दोन प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. एक म्हणजे नियमित बॅचचे प्रशिक्षण आणि दुसरे म्हणजे क्रीडा कोट्यातील लोकांचे प्रशिक्षण. नियमित बॅचचे प्रशिक्षण ९ जुलै २०२१ रोजी सुरू झाले, तर क्रीडा कोट्यातील उमेदवारांचे प्रशिक्षण फेब्रुवारी २०२१ पासून सुरू झाले.
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये धमकी देणे महागात पडले
मोनाचे हे गुपित उघड कसे झाले? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रथम प्रशिक्षणाचे स्वरूप समजून घ्या. प्रशिक्षणाचे तीन प्रकार आहेत. बेसिक, फील्ड आणि सँडविच. सँडविच प्रशिक्षण ११ ते २३ सप्टेंबर या कालावधीत होणार होते. यानंतर सर्वांना जॉईनिंग लेटर मिळणार होती. दोन्ही ट्रेनिंग दरम्यान वेळ घालवण्यासाठी मोना सँडविच ट्रेनिंगला हजर राहण्यासाठी आली होती. अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या उपनिरीक्षकांनी स्वतःचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. जिथे मोनाची एका सब इन्स्पेक्टरशी वाद झाला आणि त्यानंतर मोनाने त्याला अकादमीतून हाकलून देण्याची धमकी दिली. येथूनच तिचे गुपिते उघड होऊ लागली.
ज्या ट्रेनी उपनिरिक्षकाला मोनाने धमकी दिली त्याने तिच्याबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली. परंतु मोनाचे नाव कुठल्याही कोट्याच्या यादीत नसल्याचे पाहून त्याला धक्का बसला. त्यानंतर त्याने मोनाबाबत अकादमीच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली. तेव्हा मोना हा सगळा बनाव करत असल्याचे समोर आले. त्यानतंर तातडीने मोनाविरोधात शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोनावर गुन्हा दाखल होताच ती अकादमीतून फरार झाली. आता राजस्थान पोलिस तिचा शोध घेत आहे. मात्र या प्रकारामुळे राजस्थान पोलिस अकादमीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.