मुंबई : शूज, पर्समधून २० कोटी किमतीच्या २.८०० किलो कोकेनच्या तस्करीचा डाव एनसीबीने उधळून लावला असून याप्रकरणी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटच्या दोन परदेशी महिलांना बेड्या ठोकल्या. एनसीबी मुंबईने या कारवाईत मरिंडा एस. आणि एच. मुसा नावाच्या दोन परदेशी महिला तस्करांना बेड्या ठोकल्या.
एनसीबी मुंबईचे प्रमुख अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सिंडिकेटद्वारे मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होणार असल्याची माहिती मिळताच तपास सुरू केला. या ड्रग्ज रॅकेटमध्ये मरिंडा एस नावाच्या दक्षिण आफ्रिकन महिलेबाबत माहिती एनसीबीला मिळाली. याच माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचून रविवारी इथियोपिया येथून मुंबईत आलेल्या मरिंडा एस. हिला ताब्यात घेतले. दोन जोडी बूट आणि पर्समधील पोकळीमध्ये अशी एकूण ८ कोकेनची पाकिटे लपवून ठेवण्यात आली होती. मरिंडा एस हिला ताब्यात घेऊन एनसीबीने तिच्याकडे कसून चाैकशी केली असता तिने अंधेरीतील एका हाॅटेलमध्ये एका व्यक्तीला हे ड्रग्ज पोच करायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार, एनसीबीच्या दुसऱ्या पथकाने अंधेरीतील हाॅटेलमध्ये सापळा रचून एच. मुसा या नायजेरियन महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत ती मरिंडाकडून माल घेण्यासाठी आली असल्याचे सांगितले.
काेकेनचा प्रवास अमेरिका ते मुंबई -दक्षिण अमेरिकेतून हे कोकेन मुंबईत तस्करीसाठी आणण्यात आले होते. दोन्ही महिलांकडे त्यांचे स्थानिक ग्राहक आणि विदेशात असलेले पुरवठादार यांच्याबाबत चाैकशी सुरू असल्याचे एनसीबीने सांगितले. तसेच, त्यांच्याकडील मोबाइलही पथकाने ताब्यात घेत अधिक तपास सुरू आहे.