मडगाव - सोमवारीच तो युकेतून आपल्या केपे येथील घरी आला होता. मंगळवारी एक पार्सल देण्यासाठी तो आपल्या दुचाकीवरुन मडगावला गेला होता. सायंकाळी परत येताना आगरामरड-गुडी, पारोडा येथे त्याच्या स्कुटरला बसची धडक बसली आणि तो रस्त्यावर आपटला गेल्याने तिथेच गतप्राण झाला.
बब्रूमड्डी-केपे येथील मायकल डिकुन्हा (46) याची ही हृदयदाहक घटना असून दोन दिवसांपूर्वीच युकेतून आपला मुलगा आला म्हणून खुष असलेल्या त्याच्या आईला मंगळवारी कुणी ही मृत्यूची वार्ता सांगण्यासही तयार नव्हते. त्याची आई हृदयरोगाची रुग्ण असून तिला ही वार्ता कशी सांगावी या विवंचनेत तिचे शेजारी होते.
केपे-मडगाव दरम्यानचा हा रस्ता अत्यंत खराब असून त्यामुळेच हा अपघात झाला असे सांगण्यात येत आहे. केवळ केपे-मडगाव रस्त्यांवरच नव्हे तर गोव्यातील कित्येक रस्त्यांची स्थिती अशीच असून या जीवघेण्या रस्त्यांकडे अजुनही दुर्लक्ष केले जाते अशी खंत आप पक्षाचे गोवा निमंत्रक एल्वीस गोमीस यांनी व्यक्त केली. एक असंवेदनशील सरकारचे हे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले.
मागच्या वर्षी रस्ता अपघातातील बळींचा आंकडा खाली उतरला. एवढेच नव्हे तर 31 डिसेंबरची रात्रही कुठल्याही अपघातविना पार पडली अशी फुशारकी प्रशासन मारत असले तरी जानेवारीच्या पहिल्या 22 दिवसांतच गोव्यात तब्बल 20 जणांना रस्ता अपघातात मरण आले आहे. त्यापैकी 17जण दुचाकी स्वार असून यातील बहुतेक अपघात खराब रस्त्यामुळेच झाल्याचे दिसून आले आहे. 17 जानेवारी रोजी म्हापसा येथेही अशाच खराब रस्त्यामुळे एलॉयसीस आल्वारिस या 28 वर्षीय युवकाचा बळी गेला होता.
गोव्यात दिवसा ढवळ्या रस्त्यावर लोकांचे बळी जात आहेत आणि आमचे सरकार हे रस्ते दुरुस्त करण्याऐवजी कॅसिनोवर जाण्यासाठी लोकांना सोयीचे व्हावे यासाठी पुल बांधत आहेत अशी टीका एल्वीस गोमीस यांनी केली. गोमीस यांनी बुधवारी मडगाव-केपे रस्त्याची पहाणीही केली. ते म्हणाले, हा रस्ता अत्यंत खराब आहे. जर 15 दिवसात त्याची दुरुस्ती झाली नाही तर आप लोकांना घेऊन रस्त्यावर उतरेल असे ते म्हणाले.