राजकुमार जोंधळे / लातूर: चोरट्या मार्गाने गांजाची विक्री, वाहतूक करणाऱ्या जीपसह ओडिसा राज्यातील एकाला पोलिस पथकाने लातुरातील कव्हा नाका ते कन्हेरी चौक रोडवर बुधवारी अटक केली. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, मधुमंगल मनरंजन बिस्वास (वय ४७ रा. तारलाकोटा ता. चित्रकुंडा जि. मलकानगिरी, ओरिसा राज्य) हा बुधवारी कव्हा नाका ते कन्हेरी चौक दरम्यान सर्व्हिस रोडवर बालाजी कुशन दुकानासमोर बोलेरो जीपमधून (ओ.आर. ०२ बी. ए. ३४३५) गांजाची विक्री करण्यासाठी चोरट्या मार्गाने वाहतूक करत असल्याची खबऱ्याने गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जीपसह एकाला ताब्यात घेत झाडाझडती घेतली असता, एका पांढऱ्या रंगाच्या पोत्यात बी-मिश्रित ओलसर १९ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा (किंमत ३ लाख ८६ हजार), दोन मोबाईल (किंमत १६ हजार) आणि जीप (किंमत ५ लाख) असा एकूण ९ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून गांजासह जीपही जप्त केली आहे.
याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक श्रीशैल महादेव कोले ( वय ४६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री उशिरा गुरनं. २०/ २०२४ कलम २० (बी) इएनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे करीत आहेत.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक आक्रम मोमीन, राम गवारे, दामोदर मुळे, दयानंद आरदवाड, उमाकांत पवार, राजेंद्र टेकाळे दत्तात्रय शिंदे, काथवटे, रणवीर देशमुख, रवीसन जाधव, शिवाजी पाटील, संतोष गिरी, अनिल कज्जेवाड, नारायण वाघमारे, शिवा भाडोळे, सोमनाथ खडके यांच्या पथकाने केली आहे.