अकाेला : गीताजंली एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असलेल्या वृद्ध दांपत्याजवळील एका हिऱ्याच्या हारासह १९ लाख १२ हजार रुपयांचे दागदागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी पहाटे गाेंदियानजीक घडली. याप्रकरणी गाेंदिया पाेलिसांनी गुन्हा दाखल करून चाेरीचा तपास सुरू केला आहे. अकोला लोहमार्ग पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला असल्याची माहीती आहे.
शहरातील कोठारी बिल्डर्सचे नातेवाईक असलेले रमाकांत रतनलाल सारडा (वय ६४ रा. मोहबाबाजार, हिरापूर रोड, श्रीरात चौक, रायपूर) हे पत्नीसह रायपूर रेल्वेस्थानकावरून हावडा -मुंबई गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बी २ कोचमधील बर्थ क्रमांक २ आणि ३ या वर बसले असताना गोंदिया स्थानकाच्या आऊटरवर त्यांच्या पत्नीने उशाशी पर्स ठेवली होती. त्यामध्ये सोन्याच्या दोन बांगड्या, १४ लाख रुपये किमतीचा हिऱ्याचा हार, दागिने, १२ हजार रुपये रोख व दोन मोबाइल ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उशीखालील पर्स अलगद काढून लंपास केली. पुढे त्यांना आपल्याकडील पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. अकोला रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन आपबिती सांगितली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गोंदिया रेल्वेस्थानक परिसरातील असल्याने पोलीस निरीक्षक किरण सावळे यांनी भादंविचे कलम ३७९, ३५६अन्वये गुन्हा दाखल करून गोंदिया रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे.