पाचोरा (जि. जळगाव) : रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवीत लोहटार (ता. पाचोरा) येथील सात युवकांची २० लाखांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पाचोरा पोलिसात भुसावळ येथील रेल्वे कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. प्रकाश हरचंद सोनवणे (५०, रा. भुसावळ) असे फसवणूक करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सोनवणे याची मुलगी लोहटार येथे राहत असल्याने त्याचा गावातील युवकांशी संपर्क आला. रेल्वेत नोकरीस लावून देतो, यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणून युवकांकडून गेल्यावर्षी रक्कम घेतली. यात मोहन फकिरा चौधरी, मोतीलाल सुखदेव चौधरी, आत्माराम दोधा चौधरी, नीलेश दौलत चौधरी, रावसाहेब दिलीप पाटील, पंकज राजेंद्र पाटील यांच्याकडून प्रत्येकी तीन लाख रुपये व राजाराम राघो पाटील यांच्याकडून दोन लाख असे एकूण वीस लाख रुपये घेतले. सोनवणे हा या युवकांना नोकरी लावण्याबाबत चालढकल करीत होता. आपली फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
सोनवणे याच्याविरुद्ध यापूर्वीच चोपडा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यास चोपडा पोलिसांनी अटक केली आहे. लोहटार येथील या युवकांनी एकत्रित येत पाचोरा पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून प्रकाश सोनवणे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.