जमीर काझी
मुंबई - विधानसभा निवडणूकीसाठी अवघे काही दिवस उरले असताना राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी शेजारील राज्यातील होमगार्डना बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. कर्नाटक, गुजरात, तेलंगणा व मध्यप्रदेशातून तब्बल २० हजार होमगार्ड्सना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या बंदोबस्ताच्या बीलापोटी ८ कोटी ७७ लाख ९७०० रुपये खर्च येणार आहे.
परराज्यातील होमगार्डच्या बंदोबस्तासाठी लागणाऱ्या खर्चाला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे येत्या २,३ दिवसामध्ये राज्यात रूजू होतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे. विशेषत: नक्षलग्रस्त भाग व संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त सशस्त्र पोलीस तैनात केले जाणार आहे. त्यासाठी राज्यातील पोलीस दलाबरोबरच एसआरपी, होमगार्डचे जवानाबरोबरच परराज्यातील पोलीस व जवानांना पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २० हजार होमगार्ड पाचारण करण्याच्या प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला सादर केला होता. त्याला बुधवारी अत्यावश्यक बाब म्हणून मंजुरी दिली आहे.
कर्नाटक, गुजरात,मध्यप्रदेश व तेलगंणा राज्यातील होमगार्डच्या निवडणूक कालावधीतील बंदोबस्तासाठी एकुण ८ कोटी ७७ लाख ९७० रुपये खर्च येणार आहे. मतदानाच्या दिवशी व त्यापूर्वी २४ तास संबंधित होमगार्डना विविध मतदान केंद्रावर तैनात केले जाईल.
महाराष्ट्रात सध्या जवळपास ५० हजारावर होमगार्ड कार्यरत आहेत. त्यांना संबंधित जिल्ह्यातील मतदारसंघात ड्युटी दिली जाईल, त्याशिवाय चार परराज्यातील २० होमगार्डही बंदोबस्तामध्ये तैनात केले जाणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रावर त्यांची नियुक्ती जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.