कानपूर - उत्तर प्रदेशच्या सरकारी बँकेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. याठिकाणी एक महिला तिच्या मुलीसह लॉकर रिनुअल करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पोहचली होती. कागदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ही महिला तिचा लॉकर पाहण्यासाठी स्ट्राँग रूममध्ये पोहचली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
या महिलेनं तिच्या लॉकरमध्ये २० तोळे सोनं ठेवलं होते. परंतु लॉकर उघडताच ते सोनं गायब असल्याचं आढळलं. महिलेने याबाबत तातडीनं बँक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं अखेर हे प्रकरण पोलिसांकडे पोहचले. आता या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली आहे. कानपूरच्या कारी कलारी गावातील ही घटना आहे.
याठिकाणी SBI बँकेत शैलेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी माया यांनी संयुक्त खाते उघडले होते. त्याच बँकेत एक लॉकरही सिंह दाम्पत्यांनी घेतले होते. शैलेंद्र यांचा २०१८ मध्ये मृत्यू झाला. ९ एप्रिलला माया तिच्या मुलीसह बँकेत लॉकर रिनुअल करण्यासाठी पोहचली. याठिकाणी बँकेची कागदपत्रे प्रक्रिया करून बँक कर्मचाऱ्यासोबत महिला स्ट्राँग रुममध्ये दाखल झाली. महिलेनं जसं चावी उघडून लॉकर उघडलं तेव्हा तिला मोठा धक्का बसला.
लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्याचा डबा रिकामा होता. याच डब्यात २० तोळे सोने ठेवले होते. दागिने गायब झाल्याचं पाहून बँक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला. २०१८ पासून हे लॉकर उघडलेच नव्हते हे तपासात समोर आले. पोलिसांनी महिलेच्या जबाबानंतर गुन्हा नोंद करून घेतला आहे. त्यासोबत बँकेच्या लॉकरमधून दागिने गायब झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.