उरण - नवी मुंबई पोलिसांना एका २० वर्षीय मुलीचा मृतदेह रस्त्याशेजारी सापडला, या घटनेनं २०१२ च्या निर्भया प्रकरणाची आठवण ताजी झाली. अत्यंत निर्घृण अवस्थेत या मुलीची हत्या करण्यात आली होती. एखाद्या जनावरासारखं मुलीवर अत्याचार करण्यात आले. तिच्या प्रायव्हेट पार्टला जखमा झाल्या होत्या. ज्या मुलीचा मृतदेह सापडला तिच्यावर ६ वर्षापूर्वी एका मुलाने लैंगिक शोषण केलं होतं. ज्या आरोपीने हे कृत्य केले होते त्यानेच जेलमधून सुटल्यावर मुलीची हत्या केली आहे.
२५ जुलैला गायब झाली होती मुलगी
रायगडच्या उरण तालुक्यात राहणारी २० वर्षीय यशश्री शिंदे घरातून बाहेर गेली अन् अचानक गायब झाली होती. २५ जुलैला ती मैत्रिणीला भेटायला जाते सांगून घरातून निघाली. परंतु संध्याकाळ झाली तरीही परतली नाही. तिचा मोबाईल बंद होता. घरच्यांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र हाती निराशा आली. त्यानंतर कुटुंबाने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली.
पोलिसांना सापडला बेवारस मृतदेह
कॉमर्सचं शिक्षण घेत असलेली यशश्री एका कंपनीत डेटा ऑपरेटरचं काम करत होती. ती बेपत्ता होण्याची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. शनिवारच्या रात्री कोटनाका परिसरात एका पेट्रोल पंपजवळ बेवारस मृतदेह पोलिसांना सापडला. हा मृतदेह एका मुलीचा होता. तिचं वयही साधारण २०-२२ इतकेच होते. त्यामुळे पोलिसांनी यशश्रीच्या घरच्यांना कळवलं. हा मृतदेह पाहून तो यशश्रीचा असल्याची ओळख घरच्यांनी पोलिसांना दिली.
कमरेवरील टॅटूने ओळख पटली
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. चेहऱ्यावर आणि प्रायव्हेट पार्टवर वार केले होते. शरीराचा काही भाग कुत्र्यांनी ओरबडला होता. मात्र मृतदेहावरील कपडे आणि तिच्या कमरेवर असलेल्या टॅटूने घरच्यांना तिची ओळख पटली. पण यशश्रीची ही अवस्था कुणी केली, अखेर तिचे आणि तिच्या घरच्यांचे शत्रू कोण असे प्रश्न पोलिसांना पडले.
टॅक्सी ड्रायव्हर मुलीला त्रास द्यायचा
पोलिसांनी तपास सुरू करताच त्यांच्यासमोर जुनी घटना आली. घरच्यांनी सांगितले की, २०१८ साली दाऊद नावाचा एक टॅक्सी ड्रायव्हर यशश्रीला खूप त्रास द्यायचा. त्याने यशश्रीचे शोषण केले होते. त्यानंतर पॉक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दाऊदला पकडून जेलमध्ये पाठवलं होते. त्यानंतर तो जेलमधून सुटला होता. या घटनेमागे दाऊदचाच हात असल्याचा संशय निर्माण झाला. पोलिसांनी दाऊदचा मागोवा घेतला.
बदल्याच्या भावनेत दाऊदनं रचला कट
जेलमधून बाहेर आल्यानंतर दाऊद पुन्हा यशश्रीच्या मागे लागला. त्याला जेलमध्ये पाठवल्याचा बदला घ्यायचा होता. त्यासाठी त्याने मुलीला त्याच्या जाळ्यात ओढलं. दाऊदनेच मुलीला भेटायला बोलावलं होतं आणि संधी मिळताच त्याने मुलीला संपवलं. दाऊदने ज्यारितीने यशश्रीची हत्या केली ती पाहता त्याच्या मनात मुलगी आणि तिच्या घरच्यांबाबत किती राग होता हे दिसून येते.
CDR मधून मिळाला पुरावा
दाऊद हा मूळचा कर्नाटकचा राहणारा आहे. यशश्रीचं शोषण केल्याप्रकरणी त्याला जेलमध्ये जाण्याची शिक्षा झाली होती. जेलमधून सुटताच तो कर्नाटकला गेला होता. त्यानंतर तो नवी मुंबईत परतला. पोलिसांनी त्याच्या मोबाईलमध्ये सीडीआरमधून मुलीच्या संपर्कात असल्याचं दिसून आले. उरणमधील या घटनेनं स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. या घटनेतील दोषीला कठोर शासन करावे अशी मागणी लोकांनी केली आहे.