सांगली : नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाळवणी (ता. खानापूर) येथील तौफिक उर्फ अमिनुल्ला सलीम मुल्ला (वय २४) याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरीक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. तसेच पिडीत मुलीला शासनाने नुकसानीची रक्कम अदा करण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले. या खटल्यात सरकारपक्षातर्फे ॲड. वैशाली मुरचिटे यांनी काम पाहिले.
पिडीत मुलगी तेरा वर्षाची असून आरोपी तौफिकच्या नात्यातील आहेत. पिडिता घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. यातून पिडीता गर्भवती राहिली. ही बाब तिच्या पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैदयकिय अधिकांऱ्यांना पिडीतेविरुध्द लैंगिक अत्याचाराची बाब लक्षात आली. या प्रकरणी आरोपी तौफिकविरूद्ध विटा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला.
या खटल्यात पिडीत मुलगी, तिची आई, वैदयकिय अधिकारी, पोलीस अधिकारी व रासायनिक विश्लेषक आदिसह बारा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. न्यायालयाने आरोपी तौफिक याला वीस वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजार दंडाची ठोठावली आहे.
नव्या कायद्यानुसार पहिली शिक्षा
अल्पवयीन मुलींवर, त्यांच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेवून होणारे लैंगिक अत्याचारास आळा बसण्यासाठी शासनाने २०१८ साली भारतीय दंड संहिताचे कलम ३७६ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. सोळा वर्षांच्या खालील अल्पवयींन मुलींवर होणा-या लैंगिक अत्याचारासाठी कमीत कमी वीस वर्षांच्या सश्रम कारावासाच्या कठोर शिक्षेची तरतूद केलेली आहे. न्यायालयाने प्रथमच या दुरुस्ती कलमानुसार आरोपीला शिक्षा सुनावली.