अकाेला : खदान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आळशी प्लाॅट येथील एका मनाेरुग्ण महिलेला पळवून नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दाेन आराेपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांच्या न्यायालयाने बुधवारी दाेषी ठरवीत तब्बल २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासाेबतच २५ हजार रुपयांचा दंडही ठाेठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. गाैरक्षण राेडवरील खंडेलवाल भवनमागे असलेल्या आळशी प्लाॅट येथील रहिवासी अनुप ऊर्फ गुड्डू गणेश परिहार (वय २५) व त्याचा साथीदार चंद्रकांत किशाेर निलाखे (३५) या दाेघांनी याच परिसरात रहिवासी असलेल्या एका मनाेरुग्ण महिलेस घरातून जबरदस्तीने बाहेर नेऊन तिच्यावर जबरी बलात्कार केल्याची घटना २ जानेवारी २०१६ राेजी घडली हाेती. या प्रकरणाची माहिती महिलेच्या भावास मिळताच त्यांनी या प्रकरणाची तक्रार खदान पाेलीस ठाण्यात दिली. पाेलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ ड, ३७६, ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या आराेपींना अटक करण्यात आली असून, तेव्हापासून आराेपी कारागृहात आहेत. या प्रकरणाचा तपास खदान पाेलिसांनी करून सहायक पाेलीस निरीक्षक मालती कायटे यांनी दाेषाराेपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांच्या न्यायालयाने ११ साक्षीदार तपासल्यानंतर समाेर आलेल्या ठाेस पुराव्यांच्या आधारे दाेनही आराेपींना दाेषी ठरवीत २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासाेबतच २५ हजार रुपये दंडही ठाेठावला. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने ॲड आनंद गाेदे यांनी कामकाज पाहिले, तर काेर्ट पैरवी अधिकारी म्हणून पाेलीस अंमलदार कान्हेरकर यांनी कामकाज पाहिले.
अशी ठाेठावली शिक्षा
भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ ड अन्वये २० वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा कारावास, कलम ३७६ अन्वये १० वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. कलम ३६३ अन्वये ७ वर्षांचा कारावास व ५ हजार रुपये दंड ठाेठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांच्या कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.