उमरखेड (जि. यवतमाळ) : नागपूर-तुळजापूर महामार्गावर उमरखेडनजिक पैनगंगा नदीच्या पुलाजवळ अक्षय करे या २० वर्षीय युवकाचा गुरुवारी मध्यरात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला. यात मित्रच वैरी निघाला असून पोलिसांनी त्याला अवघ्या १२ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. आकाश नामदेव लोंढे (२०) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मित्राचे नाव आहे.
गुरुवारी रात्री अक्षय वसंतराव करे आणि आकाश नामदेव लोंढे हे दोघेही शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर नागपूर-तुळजापूर महामार्गावरील एका ट्रेडिंग कंपनीजवळ दारू घेण्यासाठी बसले होते. रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला. नंतर झटापट झाली. या झटापटीत अक्षय करे खाली पडला. हे बघून आरोपी आकाशने डांबराचे मोठे दगड घेऊन अक्षयच्या डोक्यावर घातले. यात अक्षयचा मृत्यू झाला.पोलिसांनी लगेच तपासचक्रे फिरवून शुक्रवारी रात्रीच चार संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यात आकाशचा समावेश होता. त्यांनी पोलिसांना खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आकाशविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसडीपीओंनी फिरविली तपासचक्रेया गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांनी तातडीने चक्रे फिरविली. त्यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार आनंद वागतकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गाडे, विनीत घाटोळ, सी.एम. चौधरी, विजय पतंगे, कैलास नेवकर, संदीप ठाकूर यांनी संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यामुळे अवघ्या १२ तासांत आरोपीने खुनाची कबुली दिली.