धारणी (अमरावती) : स्थानिक एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयामार्फत आदिवासी लाभार्थींना एचडीपीई तसेच पीव्हीसी पाइप वितरणात घोळ करून कोट्यवधींचा अपहार करण्यात आल्याची तक्रार धारणी पोलीस ठाण्यात १७ जानेवारी रोजी दाखल झाली आहे. यासंदर्भात दोन तक्रारी दाखल झाल्या असून, आरोपींमध्ये तत्कालीन प्रकल्प अधिकाऱ्याचा समावेश आहे. अपहाराची एकूण रक्कम २ कोटी ९२ लाख ९८ हजार ४५५ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दोन्ही तक्रारींच्या अनुषंगाने आठ मुख्य आरोपींसह प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अन्य संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रांनुसार, पहिली तक्रार ही १७ जानेवारी रोजी रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी धारणी येथील प्रकल्प कार्यालयाचे सहायक लेखाधिकारी दिनेश माहुरे (५४) यांनी दाखल केली. त्यानुसार, प्रकल्प कार्यालयामार्फत सन २००४-०५ ते २००८-०९ या कालावधीत आदिवासी लाभार्थींना १९ हजार ८११ नग पीव्हीसी/एचडीपीई पाइप वितरित करावयाचे होते. या कालावधीत १ कोटी ४ लाख ९९ हजार ८३० रुपयांच्या या पाइपचे ७०० लाभार्थींना केले जाणार होते. तथापि, प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांनी २५२ लाभार्थींची यादी तयार केल्यानंतर फक्त ६० जणांना पाइप वाटप केल्याचे कागदोपत्री दाखविले. याप्रकरणी सहायक लेखाधिकारी माहुरे यांनी १७ जानेवारी रोजी धारणी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी नितीन प्रल्हाद तायडे, एस. रमेश कुमार, तत्कालीन प्रकल्प अधिकारी दीपककुमार मारोतराव हेडाऊ, ए.डी. पवार, पी.व्ही. घुले, सी.पी. राठोड, तत्कालीन कनिष्ठ लिपिक व इतर संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत.
दुसरी तक्रार शुक्रवारी रात्रीच ८ वाजून ३० मिनिंटांनी सहायक लेखाधिकारी दिनेश माहुरे यांनी धारणी पोलिसांत दाखल केली. त्यानुसार, प्रकल्प कार्यालयामार्फत २००४-०५ ते २००८-०९ याच कालावधीत १३२९ लाभार्थींना १ कोटी ८७ लाख ९८ हजार ६२५ रुपयांचे ३७ हजार २२५ एचडीपीई पाइप वितरित करावयाचे होते. तथापि, ५१५ अपात्र लाभार्थींची यादी तयार करून सदर रकमेची संबंधित अधिकाऱ्यांकडून परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी तत्कालीन प्रकल्प अधिकारी दीपककुमार हेडाऊ, एस. रमेश कुमार व इतर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले.न्या. गायकवाड समितीचा अहवालयाप्रकरणी अपहाराच्या तक्रारी झाल्यानंतर न्या. गायकवाड समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अहवालावरून प्रकल्प कार्यालयाच्या लेखाधिकाऱ्यांनी धारणी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या. याप्रकरणी धारणी पोलिसांनी भादंविचे कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत.