गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: सध्या शहरात वाढत चाललेली आणि जीवघेणी ठरलेली 'इन्स्टंट लोन अॅप' फसवणूकीची २१ प्रकरणे पोलीस ठाण्याकडून काढून 'सायबर सेल'कडे वर्ग करण्यात येणार आहेत. सहपोलीस आयुक्त (गुन्हे) सुहास वारके यांनी हे आदेश दिल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे पोलीस ठाण्याचा भार काही प्रमाणात हलका होणार असला तरी दररोज येणाऱ्या अर्जाचा खच मात्र वाढतच असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मंगळवारी हे आदेश काढण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वारके यांना पितृशोक झाल्याने ते सध्या सुट्टीवर आहेत. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त भार हा मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्याकडे आहे. मुंबईत सायबर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या शिवाजीनगर पोलीस ठाणे, बिकेसी सायबर सेल, वांद्रे येथील पश्चिम प्रादेशिक विभाग कार्यालय, उत्तर विभाग येथील समतानगर पोलीस ठाणे, मध्य विभाग वरळी पोलीस ठाणे आणि दक्षिण विभाग डी बी मार्ग पोलीस ठाणे यांच्याकडे त्या त्या हद्दीतील 'इन्स्टंट लोन अॅप' प्रकरणाची चौकशी सोपविण्यात येणार आहे.
याबाबत मंगळवारी सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यानी माहिती दिली. त्यामुळे किचकट अशा प्रकरणाच्या तपासाचा असलेला भार काही प्रमाणात हलका होईल असे मत स्थानिक पोलीस ठाण्याकडून व्यक्त करण्यात आले. मात्र दुसरीकडे दिवसेंदिवस येणाऱ्या अर्जाचा खच वाढत आहे. त्यामुळे पुन्हा तितकिच प्रकरणे नव्याने दाखलही होत असल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली. मात्र मनुष्यबळ आणि अद्ययावत यंत्रणा उपलब्ध असल्याने सायबर सेलला गुन्ह्याची उकल करण्यात लवकर यश मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.