फरीदाबाद - शहरातील एका कॉलेज युवतीची कॉलेजच्या गेटबाहेरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत विद्यार्थींनी बी-कॉम च्या तिसऱ्या वर्गात शिकत होती, सोमवारी सायंकाळी 4 वाजता पेपर देऊन कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर तिच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. बल्लभगढ येथील अग्रवाल कॉलेजबाहेर ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने सोहना-बल्लभगढ रस्त्यावर रास्ता रोको केला.
उत्तर प्रदेशच्या हापूल येथील मूळ रहिवाशी असलेल्या निकिता तोमरचे कुटुंबीय फरीदाबाद येथे शिफ्ट झाले होते. याप्रकरणी मुलीचे वडिल मूलचंद तोमर यांनी सांगितले की, तौशीफ नावाचा मुस्लीम कुटुंबातील मुलगा 12 वी पर्यंत निकीतासोबतच शिक्षण घेत होता. यावेळी, निकीतासोबत मैत्री करण्याचा प्रयत्नही त्याने अनेकदा केला असून तिचे धर्मांतर करण्याचा त्याचा डाव होता. मैत्री आणि जबरदस्ती विवाहासाठी नकार दिल्यानंतर तौशीफने सन 2018 साली निकाताचे अपहरण केले. मात्र, बदनामीच्या कारणास्तव त्यावेळी कुटुंबीयांना ते प्रकरण आपापसात मिटवले होते.
वडिलांच्या सांगण्यानुसार, सोमवारी परीक्षा देण्यासाठी निकीता कॉलेजला गेली होती. पेपर सुटल्यानंतर सायंकाळी 4 वाजता तिची आई आणि भाऊ कॉलेजबाहेर निकीची वाट पाहत होते. त्यावेळी, अचानक एक कार तेथे आली, त्या कारमधून आलेल्या तीन ते चार जणांनी निकीताला गाडीत खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये, तौशीफ सर्वात पुढे होता. मात्र, निकिताच्या भावाला पाहिल्यानंतर तौशीफने निकीतावर गोळी झाडली. शेजारीच असलेल्या निकीताच्या मैत्रिणीने पोलिसांना फोन करुन यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निकिताल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.
दरम्यान, सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेण्यात येत असून मुख्य आरोपी तौशीफ यास पोलिसांनी अटक केल्याचे बल्लभगडच्या डीसीपींनी सांगितले.
भाजपा नेत्या प्रिती गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरु या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, जर तुम्ही समस्या स्विकारत नसाल तर, त्याचे समाधानच होणार नाही. आज निकिता बळी गेली, उद्या आणखी कोण?... असा सवाल करत लव्ह जिहाद नाकारता येणार नसल्याचं प्रिती गांधी यांनी म्हटलं आहे.