जळगाव - 'तुमच्या मुलाला मोठ्या जागेवर सरकारी नोकरी लोवून देतो' असे आमिष दाखवून तिघांनी विमा कंपनीत कामाला असलेले प्रवीणचंद्र पांडूरंग दिघोळे (५८, रा. शिवकॉलनी) यांची तब्बल २२ लाखात फसवणूक केल्याचा प्रकार समार आला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून रविवारी तिन्ही ठगांविरूध्द रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शिवकॉलनी येथे प्रवीणचंद्र दिघोळे हे कुटूंबासह वास्तव्यास आहे. त्यांच्या मुलाला मंत्रालयात नोकरी लावण्यासाठी सन २०१८ मध्ये चंद्रभान जवरीलाल ओसवाल व त्याचा भाऊ अनिल ओसवाल (दोन्ही रा. धुळे) यांनी त्यांना फोन केला होता. नंतर १० मे २०१८ रोजी दोन्ही दिघोळे यांच्या घरी येवून तुमच्या मुलाला मंत्रालयात मोठ्या पदावर नोकरी लावून देवू, त्याठिकाणी अधिकारी ओळखीचे असून २२ लाख रूपये द्यावे लागतील, असे सांगितले. दिघोळे यांनी त्याच दिवशी दोघांना ९ लाख रूपये दिले. नंतर २७ मे रोजी पुन्हा घरी बोलवून ७ लाख रूपयांची रक्कम दिली. त्यावेळी त्यांना लवकरच मुंबई येथे जॉईनिंक ऑर्डर घेण्यासाठी जावू असे सांगण्यात आले. मात्र, ओसवाल बंधूनी तब्बल दोन वर्ष दिघोळे यांनी चकवले. अखेर १६ फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रभान हा बनावट निवडपत्र घेवून दिघोळे यांच्याकडे आला.
तुमच्या मुलाचे काम झाले असून १८ फेब्रुवारी २०२१ रोजी कामावर रूजू केले जाईल. मात्र, १८ रोजी दिघोळे कुटूंबिय मुंबईत आल्यानंतर त्यांना कुणीही भेटले नाही. म्हणून पुन्हा घरी परतावे लागले. त्यावेळी त्यांना दुसरी नोकरीची व्यवस्था करून देतो सांगून ओसवाल याने त्यांची हरताली प्रसाद रोहिदास यांची भेट करून दिली. हरताली याने त्यांना मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनिअर या पदाची ऑर्डर देतो, असे आमिष दाखवून सहा लाखांची मागणी केली. त्यानुसार त्यांनी त्याच्या खात्यावर ८ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ६ लाख रूपये पाठविले. मात्र, नोकरी लावून दिली नाही. उलट व्हॉट्सॲपवर बनावट जॉईनिंग आणि अपॉईंटमेंट ऑर्डर पाठविली. अखेर आपली फसवणूक होत असल्याची खात्री झाल्यानंतर दिघोळे यांनी ओसवाल याच्याकडे दिलेले पैसे मागितले. त्याने पैसे परत केले नाही. शेवटी रविवारी त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात येवून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. तक्रार दिल्यानंतर चंद्रभान ओसवाल, अनिल ओसवाल, हरताली प्रसाद रोहिदास यांच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.