काशिनाथ वाघमारे, सोलापूर: बार्शी शहरात पोस्ट चौकातून २२ पोती ओला सुंगधी चंदन घेऊन निघालेला टेम्पो पोलिसांनी सापळा रचून पकडला. पकडलेले चंदन १ लाख ९७ हजार २०० रुपयांचे असून याप्रकरणात पोलिसांनी दोघांना पकडले आहे. परवेज बशीर सय्यद (वय ४४, रा. अन्वर कॉलनी, कागेकोडमेगे, भद्रावती, तालुका भद्रावती, जि. शिमोगा, कर्नाटक) आणि नितीन गोरख राऊत (वय ४३, रा. सर्जापूर, ता. बार्शी, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून सोमवार, १० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता बार्शी शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
चंदनाचा टेम्पो (वरील फोटो)
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बार्शी शहरात गुुरुवारी रात्री पोलिसांची गस्त सुरू होती. दरम्यान शहरात पोस्ट चौकातून एका पांढ-या रंगाच्या टेम्पोतून दोघेजण चंदन घेऊन निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी टेम्पो (एम. एच. ४५/ ए.एफ. १३४१) अडवून तपासले असता त्यात २२ पोती चंदन आढळून आले. यापैकी तीन पोत्यांमध्ये ४३.५०० किलो चंदनाचे मोठे तुकडे मिळाले तर इतर १८ पोत्यांमध्ये २२०.४०० किलो ओला सुगंधीत लहान तुकडे केलेला चंदन आढळला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कामगिरी केली. याप्रकरणी पोलीस शिपाई अंकूश जाधव यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तोरडमल करीत आहेत.