नाशिक : लोकसभा निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहे. कायदा व सुव्यवस्था नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत टिकून रहावी, सर्वत्र निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाकडून नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यांतून सुमारे २२० गुन्हेगारांना तडीपार करत पिटाळून लावले आहे. तर ४३ गुंडांना ‘एमपीडीए’अंतर्गत कारागृहात डांबण्यात आले आहे.
नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत विविध सुचना देण्यात आल्या आहेत. सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर अंकुश ठेवण्यासाठी तडीपार, स्थानबद्धतेचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तसेच आपापल्या हद्दीत अवैध धंदे करणाऱ्यांविरूद्धही कारवाई करण्याबाबतचा आराखडा तयार करून तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहे. लोकसभेचे मतदान पार पडेपर्यंत पाचही जिल्ह्यांत चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात भेटी देऊन कायदा व सुव्यवस्था आणि बंदोबस्ताचा आढावा घेण्यात येत असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी दिली. नाशिक परिक्षेत्रातून एकुण २१ हजार ८६१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत बंधपत्र लिहून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जे संघटितपणे गुन्हेगारीत सक्रीय होते, अशा सराईत गुन्हेगारांच्या तीन टोळ्यांवर आतापर्यंत ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
सोशल मीडियावर विशेष लक्षसोशल मीडियावर राजकिय, धार्मिक, सामाजिक किंंवा वैयक्तिक पातळीवर कुठल्याहीप्रकारे आक्षेपार्ह पोस्ट टाकून भावना दुखविण्याचा किंवा जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जर कोणी प्रयत्न करताना आढळल्यास त्यास तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेेत. तसेच रेकॉर्डवरील उपद्रवी इसम, दंगल भडकविणारे समाजकंटक, शरिराविरूद्ध, मालमत्तेविरूद्ध गुन्हे करणारे यांचे वर्गीकरण करून यादी तयार करण्यात आली आहे.