तळेगाव दाभाडे : कपाटातील101 तोळे सोन्याचे दागिने,14 किलो वजनाची चांदीची भांडी आणि रोख 1लाख 30 हजार रुपयांसह 23 लाख 6 हजार रुपयांचा ऐवज चाेरट्यांनी लुटला. घरफोडीचा हा प्रकार तळेगाव-चाकण रस्त्यावरील मधुबन साई सिटीमध्ये शुक्रवारी (31 ऑगस्ट) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला.या संदर्भातअशोक रघुनाथ कोरे (वय ६३,रो हाऊस नं.४८,मधुबन साईसिटी,तळेगाव स्टेशन,ता.मावळ,जि.पुणे) यांनी येथील पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी फिर्याद दिली आहे.
अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घरफोडीच्या प्रकारामुळे शहर परिसरात घबराट पसरली आहे. 18 अाॅगस्ट राेजी अशोक कोरे हे कामानिमित्त कुटूंबियांसह पालघरला गेले होते. 31 ऑगस्टला दुपारी सोसायटीच्या रखवालदाराने कोरे यांना फोन करुन त्यांच्या घराचा मागील दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. काेरे रात्री साडेदहाला घरी पोहोचले असता, बेडरूममधील कपाट फोडलेले दिसले. कपाटाचे लाॅकर तोडून त्यातील रोख रक्कम 1लाख 30 हजार रुपये ,सोन्याचा हार, मंगळसुत्र, कानातील रिंगा, सोन्याचे तोडे, अंगठ्या, नेकलेस, बांगड्या, पाटल्या, सोन्याचा टेम्पल हार, हिरा असलेल्या कानातील रिंगा असा 101 तोळे सोन्याचा ऐवज तसेच कपाटातील समई, पंचपात्र, करंडी, पेला, फुलपात्र अशी 14 किलो चांदीची भांडी घेऊन चोरट्यांनी पलायन केले. पिंपरी चिंचवड झोन दोनच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील,सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव ,येथील पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पाटील आणि जाधव यांनी पोलिसांना तपासकामी महत्वाच्या सुचना दिल्या आहेत.