दक्षिण काश्मीरच्या पुलमावा जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. २४ तासांत ३ दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. पुलवामाच्या हकरीपोरा या परिसरात ही चकमक झाली होती. लष्कर-ए-तोयबाचे ३ दहशतवादी या भागात लपून बसले असल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला आणि सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्याच वेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.मंगळवार म्हणजेच आज सकाळपासून अनेक तास ही चकमक सुरू होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. त्यात ३ एक-४७ रायफल्सचा समावेश आहे. सोमवारी याच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करून पळ काढला होता. त्याच्या विरोधात मोठी मोहिम उघडली होती. त्याला दिवसभरातच यश मिळालं. गेल्या दोन दिवसांमधली ही तिसरी चकमक असून त्यात आतापर्यंत 4 दहशतवादी ठार झाले आहेत.
सकाळीच पोलिसांना या दहशतवाद्यांबद्दल लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस, CRPF आणि SOG यांचं खास पथक बनवण्यात आले होते. त्यांचं सर्च ऑपरेशन सुरू होताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास आवाहन केलं. मात्र, त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. त्यानंतर मोठी कारवाई करत सुरक्षा दलांनी त्या ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवलं.